"जैन महामंडळास सक्षम बनविणार"; CM फडणवीस यांची पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:48 IST2025-01-07T11:47:43+5:302025-01-07T11:48:28+5:30
नांदणी येथील मठाला ‘अ’ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

"जैन महामंडळास सक्षम बनविणार"; CM फडणवीस यांची पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : प्राचीन जैन धर्माने अहिंसा व अपरिग्रह सांगितले आहे. जगात सर्वाधिक पुण्यकार्य, दानकार्य व समाजकार्य करणारा समाज म्हणून जैन धर्मीयांची ओळख आहे. आमच्या सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केले आहे. त्याला आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नांदणी येथील मठाला ‘अ’ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा व मस्तकाभिषेक महामहोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी नांदणी मठाच्या वतीने जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘प्रजागर्क’ ही उपाधी देण्यात आली.
आचार्य विशुद्धसागरजी महाराज म्हणाले, भगवान आदिनाथ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या प्रमुखपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत विहार करावा. श्रीराम, भरत व ऋषभनाथ यांच्या राज्यात ज्याप्रमाणे कोणत्याही धर्माला साधूसंतांना उपासना करण्यात कोणताही अडसर येत नव्हता, त्याचप्रमाणे आपल्या राज्यात साधूसंतांना विहार करताना, उपासना करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या.
माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोकराव माने, अमल महाडिक, सुरेश खाडे, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, माजी खासदार निवेदिता माने माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते.