पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:48 IST2025-12-11T15:44:38+5:302025-12-11T15:48:50+5:30
CM Devendra Fadnavis: पंतप्रधान मोदी १८ तास काम करतात. त्यांची तब्येत अजूनही ठणठणीत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
CM Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यापासून आता त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तरीही मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क वारंवार लढवले जातात. पंतप्रधान मोदी यांचे उत्तराधिकारी म्हणून अनेकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव पुढे असल्याची चर्चा अनेकदा ऐकायला मिळते. याबाबत आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख अनेकदा केला जातो. एनडीटीव्ही मराठीच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले आहे.
पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे काहीच कारण नाही
पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे काही कारण नाही. पंतप्रधान मोदी देशाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत आहेत. त्यांच्यामुळे जागतिक पातळीवर भारताची मोठी प्रतिमा तयार झाली आहे. पूर्वी भारत म्हणजे ‘किस झाड की पत्ती?’ अशी आपली स्थिती होती. मात्र, आत जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. भारत आता जगभरातील भूराजकीय स्थिती हाताळण्याइतका मोठा झाला आहे. हे केवळ पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे हेच नेतृत्व भारताला पुढे नेऊ शकते. बाप जिवंत असताना उत्तराधिकारी शोधणारी आपली संस्कृती नाही. ही मुघलांची संस्कृती आहे. मुघल असे वागायचे. आपण तसे काही करत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान मोदी १८ तास काम करतात, तब्येत ठणठणीत
पंतप्रधान मोदी यांची तब्येत ठणठणीत आहे. त्यांची एनर्जी उत्तम आहे. ते एखाद्या ४० वर्षांच्या तरुणाला लाजवेल इतके काम करत असतात. १७-१८ तास काम करूनही एखाद्या बैठकीत आम्ही त्यांना कधी साधी जांभयी देताना पाहिले नाही. आपल्याकडे इतका चांगला नेता, कणखर नेतृत्व असताना आपल्याला सध्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर मोदी हे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त आहेत. मोदी असे तंदुरुस्त असेपर्यंत इतरांचा विचार करायची गरज नाही. त्यामुळे २०२९ ला पंतप्रधान मोदी हेच भारताचे पंतप्रधान होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, चेन्नई येथे राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदाची धुरा कुणाकडे सोपवली जाईल, याबाबत विचारले असता यावर भाजपा आणि नरेंद्र मोदी आपापसात चर्चा करून निर्णय घेतील, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.