१८ जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्‍वर खुमखुमी कधी सिद्ध करणार ? - उद्धव ठाकरे

By admin | Published: September 26, 2016 08:03 AM2016-09-26T08:03:55+5:302016-09-26T11:16:03+5:30

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे आपण कितीही बोंबलून सांगत असलो तरी प्रत्यक्षात या सर्व पेरलेल्या बोंबा असून हिंदुस्थानच एकाकी पडत आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Will DelhiSwarwar Khumkhumi ever prove the revenge of the 18 soldiers? - Uddhav Thackeray | १८ जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्‍वर खुमखुमी कधी सिद्ध करणार ? - उद्धव ठाकरे

१८ जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्‍वर खुमखुमी कधी सिद्ध करणार ? - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे आपण कितीही बोंबलून सांगत असलो तरी प्रत्यक्षात या सर्व पेरलेल्या बोंबा असून हिंदुस्थानच एकाकी पडत असल्याची भीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. '१८ जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्‍वर आपली खुमखुमी कधी सिद्ध करणार?' असा सवाल सामना'च्या अग्रलेखातून विचारत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. उरी’च्या भयंकर हल्ल्यानंतर एकही देश हिंदुस्थानच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नसल्याचे चित्र दिसत असल्याचे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. सर्व देश ‘नाती’ व दुनियादारीपेक्षा आपला स्वार्थ आणि धंदाच बघत आहेत, असेही उद्धव यांनी नमूद केले आहे. 
(अमेरिकेसारखी हिम्मत दाखवणार नसाल तर, मोदी सरकार तुमचा काय फायदा ? - उद्धव ठाकरे) 
(हिंदुस्थानच्या हातात बांगड्या नव्हेत, भीमाची गदा आहे हे पाकिस्तानला दाखवा - उद्धव ठाकरे)
(मोदी आता तरी पाकिस्तानला उत्तर द्या - उद्धव ठाकरे)
 
 अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे : 
- हिंदुस्थानची गेली दोनेक वर्षे जी ‘दुनियादारी’ सुरू आहे ती निरर्थकच ठरली आहे. कारण ‘उरी’च्या भयंकर हल्ल्यानंतर एकही देश हिंदुस्थानच्या बाजूने ठामपणे उभा राहिला असेल तर शपथ! उरी हल्ल्यानंतर अनेक देशांनी दहशतवादाचा तोंडदेखला निषेध केला व त्या निषेधाचा वेगळाच अर्थ भाजपपुरस्कृत सोशल मीडियाने काढला आणि पाकिस्तानला एकटे पाडण्यात दिल्ली सरकार कसे यशस्वी झाले ते मांड्यांवर ‘थापा’ मारून सांगण्याचे कार्य जोमाने सुरू झाले. त्यातील पहिली थाप अशी की, रशियाने पाकिस्तानबरोबरचा युद्ध अभ्यास थांबवून पाकड्यांना चपराकच दिली. मात्र रशियाने असे काहीएक केले नसून रशियन फौजा युद्ध अभ्यासासाठी पाकिस्तानात दाखल झाल्या आहेत ही हिंदुस्थानच्या दुनियादारीला चपराक आहे. 
- उरी हल्ल्यानंतर म्हणे ‘चीन’ पाकिस्तानवर भलताच संतापला आहे, पण हेसुद्धा झूठच निघाले. चीनने पाकिस्तानला असे वचन दिले आहे की, तुमच्यावर कोणतेही परदेशी आक्रमण झाल्यास आम्ही तुमच्यासोबत आहोत. ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहू. इंडोनेशियानेही उरी हल्ल्याचा निषेध केलाच होता. पण हिंदुस्थानशी ‘प्रेमा’चे वगैरे संबंध असलेल्या इंडोनेशियाने पाकिस्तानशी संरक्षणविषयक करार करण्याचे मान्य केले असून पाकिस्तानला संरक्षण सामग्री पुरवण्याचे ठरवले आहे. म्हणजे ‘नाती’ व दुनियादारीपेक्षा जो तो आपला स्वार्थ आणि धंदाच बघत आहे. जेद्दा येथून इस्लामी राष्ट्र संघटनांचे काम पाहणार्‍या संघटनेनेही (ओआयसी) कश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. मग मधल्या काळात आमच्या राज्यकर्त्यांनी अरब राष्ट्रांत जी दुनियादारी केली त्याचा काय उपयोग झाला? 
- तुर्कस्तानने तर कमालच केली. पाकिस्तानच्या मागणीवरून हे राष्ट्र आता म्हणे ‘सत्यशोधन पथक’ कश्मीरात पाठवत आहे. नेपाळला पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध ठेवायचे आहेत आणि उरीच्या हल्ल्यानंतरही प्रिय ओबामांच्या अमेरिका राष्ट्राने पाकिस्तानचे थेट नाव न घेता दहशतवादाचा धिक्कार धिक्कार केला. अर्थात असा निषेध व धिक्कार कूचकामीच ठरतो. १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी रशियाने इंदिरा गांधींच्या म्हणजे हिंदुस्थानच्या मदतीला सातवे आरमार पाठवून मैत्री निभावली होती. तसे आज कोणी मैत्रीला जागताना दिसत नाही. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे आपण कितीही बोंबलून सांगत असलो तरी प्रत्यक्षात या सर्व पेरलेल्या बोंबा असून हिंदुस्थानच एकाकी पडला जात नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे.
-  पाकिस्तानला ‘बूच’ लागण्याचे सोडून त्यांची मुजोरी व शिरजोरी जास्तच वाढली आहे. संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानविरुद्ध पुरावे देण्याचे आता ठरले आहे; पण संयुक्त राष्ट्रसंघाने
आधीच सांगितले आहे की, ‘कश्मीरप्रश्‍नी दोघांनी बसावे आणि तोडगा काढावा.’ मात्र हे सांगण्यासाठी ‘युनो’ची गरज काय? पुन्हा तोडगा काढायचा म्हणजे काय, हे ‘युनो’ने ठासून सांगितले तर आम्ही स्वत: ‘युनो’चे भक्त होऊ, पण ‘युनो’ला न जुमानता पाकडे पंतप्रधान मस्तवालपणे सांगतात की, ‘कश्मीरातील अत्याचारांमुळेच उरीचा हल्ला झाला.’ याचा सरळ अर्थ असा की, पाकिस्तानने उरी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची हिंमत दाखवली. पाकिस्तान हे दुश्मन राष्ट्र असले तरी त्या देशाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची छाती अचानक छप्पन्न इंचांनी फुगली की काय? आणि त्यांची छाती छप्पन्न इंचांनी फुगली असेल तर त्यास त्यांचा मर्दपणा जबाबदार नसून आमचा शेपूटघालेपणा कारणीभूत आहे. 
- पाकिस्तानने केव्हाचेच युद्ध पुकारले आहे. पठाणकोटपासून उरीपर्यंत रक्ताचे पाट वाहिले आहेत. जवानांचे बलिदान सुरू आहे आणि आमचे दिल्लीश्‍वर आजही पाकला निर्वाणीचे की काय ते इशारे देण्यातच धन्यता मानत आहेत. वास्तविक पाकिस्तानला एवढीच खुमखुमी असेल तर आम्हीही लढाईस सज्ज आहोत असे आता आपण पाकला बजावले पाहिजे. पाकिस्तानच्या खुमखुमीचे राहू द्या, पण १८ जवानांच्या बलिदानाचा बदला घेऊन दिल्लीश्‍वर आपली खुमखुमी कधी सिद्ध करणार? पाकिस्तान दिल्लीश्‍वरांच्या ‘शब्दास्त्रा’ने हटणार्‍यांतला नाही. तिथे पाहिजे जातीचे असे आता दुर्दैवाने म्हणावे लागेल. देश संकटात आहे, तो अधिक गर्तेत जाऊ नये म्हणून आमचीही निर्वाणीची बोंबाबोंब आहे.
 

Web Title: Will DelhiSwarwar Khumkhumi ever prove the revenge of the 18 soldiers? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.