२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 05:03 PM2023-11-16T17:03:54+5:302023-11-16T18:00:51+5:30

लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे असं फडणवीस यांनी सांगितले.

Will contest Lok Sabha elections in 2024?; Disclosure of Deputy Chief Minister Devendra Fadnavis | २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावर अखेर फडणवीसांनी पूर्णविराम दिला आहे. मी पुढील विधानसभा निवडणूक लढणार आणि तीदेखील नागपूरमधूनच असं त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. त्याचसोबत देशातील जनतेने तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी देण्याचं ठरवलं आहे असंही म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी लोक त्यांचा विचार बदलणार नाही असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांनी पुढील दहा वर्षांत तुम्ही स्वत:ला कुठे पाहता असं विचारल्यावर या प्रश्नावर मी भाजपसोबतच राहील आणि पक्ष मला देईल ती कोणतीही जबाबदारी पार पाडू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचसोबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी दिली. मराठा आंदोलनावरही फडणवीसांनी रोखठोक भाष्य केले.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे याला प्राथमिकता आहे. मी सर्व मंत्र्यांना सांगितले, आपण मंत्री म्हणून राज्यात कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यावर फडणवीसांनी हे उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्यातील महापालिका अन्य निवडणुकीबाबत विचारणा केली असता, सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने या निवडणुकांना विलंब होतोय, आम्हालाही महापालिकांच्या निवडणुका हव्यात, कारण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महापालिकेतही उमटतील. भाजपा आणि सहकारी पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शरद पवार-अजित पवार भेटीवर काय म्हणाले फडणवीस?

दिवाळीनिमित्त शरद पवार-अजित पवार यांची भेट झाली, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध महत्त्वाचे असतात. कुणीही कुटुंबात राजकारण आणू नये अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

Web Title: Will contest Lok Sabha elections in 2024?; Disclosure of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.