पुणे - राज्याच्या राजकारणात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत असताना दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा. मी या प्रक्रियेत नाही. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित हा निर्णय घ्यावा असं मत पवारांनी मांडले आहे. पवारांनी पहिल्यांदाच उघडपणे या विषयावर भाष्य केले आहे.
एका इंग्रजी दैनिकाच्या मुलाखतीत शरद पवारांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावर सविस्तर उत्तर दिले. दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत. सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहे. त्यात काही जण अजित पवारांसोबत एकत्र येण्याचे मत मांडतायेत तर काही जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपासोबत न जाण्याची भूमिका मांडत इंडिया आघाडीसोबत कायम राहण्याचं मत मांडत आहेत. परंतु इंडिया आघाडी सध्या सक्रीय नाही. त्यामुळे आम्हाला संघटनेसोबत पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे. युवकांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच आमचा विचार विरोधात राहायचा आहे. भाजपाला पर्याय म्हणून आम्हाला उभे राहायचे आहे असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांसोबत भेटीवरही खुलासा केला. राजकारणासाठी आमची भेट होत नाही. अनेक संस्था, कारखाने आहेत तिथे आम्ही एकत्रितपणे काम करतो. मग एनडीए असेल, डावे असतील, कामासाठी या भेटी होतात. सत्तेसोबत जायचे की नाही, संसदेत विरोधात बसायचे की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असेल म्हणून मुलाखतीत शरद पवार तसे म्हटले असतील. परंतु राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुढच्या निवडणुकांना कसं सामोरे जायचे, यावर पक्षात जयंत पाटील यांच्या स्तरावर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा सुरू आहेत असं माजी मंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले. तर काही दुरावलेली सगळी कुटुंब एकत्र आली तर आम्हाला मनापासून आनंद होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांनी आज आशेचा किरण दाखवला आहे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांना मिळेल. राष्ट्रवादीची शक्तीही वाढणार आहे अशी भावना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं.