सोलापूर - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील चार नेत्यांचे पक्ष प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. भाजपा नेत्यांना महापालिकेसोबत जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात घ्यायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या नेत्यांना भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी, काँग्रेसचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे या चार जणांना भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजन पाटील यांच्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीत धर्मराज काडादी यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु, आता काडादी यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत.
कर्नाटकातील भाजप नेते, रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा हे काडादी यांचे व्याही आहेत. सोमण्णा यांच्या माध्यमातून काडादी यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले, या दरम्यान काडादी यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला आणि आमच्या संस्थांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आपण सत्ताधारी पक्षासोबत जावे, असे सभासद आणि हितचिंतकांचे म्हणणे आहे. सध्या कोणत्याही पक्षासोबत बोलणे झालेले नाही. पक्ष प्रवेशावर चर्चा झालेली नाही असं सिद्धेश्वर कारखाना प्रमुख धर्मराज काडादी यांनी सांगितले.