मुंबई : राज्यातील भाजपच्या १२ महिलाआमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र पाठवून महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्राकडे बोट दाखविण्याऐवजी राज्यातच ठोस उपाययोजना करा, असे आवाहन केले आहे. या आमदारांमध्ये माधुरी मिसाळ, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, सीमा हिरे, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, डॉ. नमिता मुंदडा, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर, मोनिका राजाळे, मुक्ता टिळक यांचा समावेश आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. संसदेचे अधिवेशन घेऊन त्याचे धिंडवडे निघण्यापेक्षा राज्यातच उपाय करणे कधीही चांगले. आता कोरोनाचे निर्बंध बरेचसे शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहात असल्याने आपणही मंत्रालयातील कार्यालयात रुजू झाला असाल या अपेक्षेने आम्ही, महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकी आपणास हे पत्र मंत्रालयाच्या पत्त्यावर पाठवत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकारकडे बोट का दाखवता? आता राज्यातील १२ महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:10 IST