मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी रामदास कदम यांना कंठ फुटला आहे. महाराष्ट्रातील मुलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा कुटिल डाव आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर आमची नार्को टेस्टची तयारी आहे. पण त्यासोबतच ज्योती रामदास कदम यांनी १९९३ साली स्वत:ला का जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली आहे.
परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यात खळबळजनक आरोप केले. अनिल परब म्हणाले की, २०१४ ते २०१९ रामदास कदम मंत्री होते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग मंत्रिपद का घेतले? तुम्ही त्याच वेळी अशा माणसासोबत मी काम करणार नाही असं सांगायला हवे होते. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीत होते, त्यावेळी २४ तास तिथे डॉक्टरांचे पथक होते. १ डॉक्टर नव्हते. तिथे असंख्य लोक भेटायला येत होते. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली होती. महाराष्ट्रातील प्रश्न बाजूला नेण्यासाठी असे आरोप करून कुटिल डाव आहे. रामदास कदम यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. या प्रकरणाची नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. अब्रू नुकसानीच्या दाव्यातून मिळणारी रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच १९९३ साली रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याचीही नार्को टेस्ट करावी. योगेश कदम गृह राज्यमंत्री आहेत. त्यांच्या बापाने काय उद्योग केले याची चौकशी केली पाहिजे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचे वाकून या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. १९९३ साली गृह राज्यमंत्र्यांच्या आईने स्वत:ला जाळून घेतले होते या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला का जाळले, या घटनेचे साक्षीदार आजही आहेत. वेळ पडली की ते समोर येतील असा सूचक इशाराही अनिल परब यांनी दिला.
दरम्यान, बाळासाहेबांचे मृत्यूपत्र मला माहिती आहे. आता जे आरोप करतायेत त्यांनी मला विचारावे. मी त्याचा साक्षीदार आहे. मृत्यूपत्रात ठसे लागतात का की नाही हे मला माहिती आहे. फक्त लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल विष कालवायचे, लोकांमध्ये उद्धव ठाकरेंचे प्रेम कमी करायचे त्यासाठी रामदास कदमांना पुढे केले गेले. शिशुपालाचे १०० अपराध झाले आहेत. मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कदमांना वाचवले. डान्सबार चालवणे, वाळू चोरणे, जमिनी लाटणे यासारखी विविध प्रकरणे सध्या समोर आली आहे. रामदास कदमांच्या पुतण्याने आत्महत्या का केली याचाही शोध घेतला पाहिजे. घरातील लोक आत्महत्या का करतायेत त्याच्या मुळाशी जावे. या अधिवेशनात पुराव्यासकट मी प्रकरण मांडणार, मुख्यमंत्री किती वेळा या लोकांना वाचवणार, मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी या मंत्र्यांना दूर केले पाहिजे असं सांगत अनिल परब यांनी घणाघात केला.
सत्य बाहेर आलेच पाहिजे....
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्या अब्रू नुकसानीचा दावा करत आहोत. त्या दाव्यात कोण डॉक्टर आहे ते समोर येईल, त्यांची विश्वासर्हता काय ते समोर येईल. बाळासाहेबांचा मृत्यू झाला हे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा शिवसेना नेत्यांनी पत्रकाराला सामोरे जाऊन ही बातमी दिली. कुठलाही मृतदेह २ दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का...सगळी माध्यमे मातोश्रीबाहेर होती. असंख्य लोक तिथे भेटायला येत होते. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक मातोश्रीवर होते. मृतदेह २ दिवस कसा ठेवला जातो याबाबत कदमांनी माहिती करून घ्यायला हवी होती. रामदास कदमांनी जो आरोप केला आहे त्याचं सत्य बाहेर आलेच पाहिजे असंही अनिल परब यांनी म्हटलं.
Web Summary : Uddhav Sena's Anil Parab alleges Ramdas Kadam deflects attention from key issues. He demands a narco test regarding the 1993 death of Kadam's wife and threatens a defamation suit, pledging proceeds to farmers.
Web Summary : उद्धव सेना के अनिल परब ने रामदास कदम पर अहम मुद्दों से ध्यान हटाने का आरोप लगाया। उन्होंने 1993 में कदम की पत्नी की मौत के संबंध में नारको टेस्ट की मांग की और मानहानि का मुकदमा करने की धमकी दी, किसानों को आय दान करने का वादा किया।