पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:04 IST2025-10-31T17:03:57+5:302025-10-31T17:04:31+5:30
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पुढे येऊन याचा खुलासा केला पाहिजे. लोकांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत असंही विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.

पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
पुणे - पैसे न मिळाल्याने रोहित आर्यने काही मुलांना ओलीस ठेवले आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेनंतर येणाऱ्या बातम्या, खुलासे या चक्रावणाऱ्या आहेत. माजी शालेय शिक्षण मत्री दीपक केसरकरांनी स्वत:च्या खिशातून या तरूणाला रक्कम दिली असं सांगतात. हे न पटणारे आहे. कुठलाही राजकारणी, मंत्री शासनाकडून येणे आहे म्हणून स्वत:च्या खिशातील रक्कम काढून देणे शक्य नाही असं सांगत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना विजय कुंभार म्हणाले की, रोहित आर्यने जे लिहून ठेवले आहे. त्यावरून त्याचे शिक्षण विभागाशी चांगले संबंध होते असं दिसून येते. शिक्षण विभागाकडून काही तरी येणे बाकी होते असं तो म्हणतो. मात्र तत्कालीन शिक्षण आयुक्त मांढरे आणि माजी मंत्री दीपक केसरकर ते नाकारत आहेत. जर पैसे बाकी नसते तर कुणी उपोषण, आंदोलन केले नसते. काही तरी व्यवहार होता. परंतु तो व्यवहार नेमका काय होता. केसरकरांनी स्वत:च्या खिशातील रक्कम का दिली. या प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा असं त्यांनी सांगितले.
तसेच अलीकडे मंत्री आणि अधिकारी थेट टक्केवारी मागण्याऐवजी त्या निविदेत, व्यवहारात स्वत:ची पार्टनरशिप ठेवतात. रोहित आर्य हा मनोरुग्ण होता की शासनाच्या या धोरणामुळे त्याला मनोरुग्ण व्हावे लागले. या सर्व गोष्टींची चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पुढे येऊन याचा खुलासा केला पाहिजे. लोकांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत असंही विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
मुलांना रोहित आर्यने ओलीस ठेवले होते. त्यांना जर काही झाले असते तर ती मोठी चूक होती. आमच्या दृष्टीने मुलांचा जीव महत्त्वाचा आहे. आजची बिले उद्या मिळतील. रोहित आर्य यांची बिले का थकली त्याबाबत शिक्षण विभागाने प्रेस नोट काढली आहे. त्यांनी एक वेबसाईट काढून मुलांकडून पैसे घेतले होते. हे पैसे पुन्हा परत देण्यास त्यांना सांगितले होते. पुन्हा असं करू नये असं हमीपत्र मागितले होते. मात्र ते न घडल्याने बिल थकले होते. सरकारी नियमांचे पालन केल्यानंतर बिल मंजूर झाले असते. योजनेसाठी निधीची तरतूद करून ठेवली होती. एका सहानुभूतीसाठी मी त्याला पैसे दिले. बिल उशिरा मिळणार होते म्हणून आर्थिक मदत केली होती असं दीपक केसरकर यांनी म्हटले होते.