राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटला आहे. तसेच मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या काही घटना मुंबई आणि आसपासच्या परिसरात घडल्या आहेत. दरम्यान, या मारहाणीच्या मुद्द्यावरून भाजपा नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, गोरगरीब हिंदूंना कशाला मारहाण करताय, हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन दखवा, असं आव्हान मनसेला दिलं आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोतलाना नितेश राणे म्हणाले की, मराठीत न बोलल्याने एका गरीब हिंदूला मारहाण करण्यात आली. हीच मारहाण करण्याची हिंमत नळ बाजार आणि मोहम्मद अली रोड येथे जाऊन दाखवा. ते दाढीवाले आणि गोल टोपीवाले मराठीत बोलतात काय, शुद्ध मराठीत बोलतात काय? तिकडे जाण्याची त्यांच्या कानाखाली मारण्याची यांची हिंमत नाही आहे. जावेद अख्तर मराठीत बोलतात काय, आमीर खान मराठीत बोतलो का? त्यांच्या तोंडातून मराठी वदवून घेण्याची हिंमत नाही. मग या गरीब हिंदूंना मारण्याची हिंमत का करताय? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. तसेच हे सरकार हिंदूंनी सत्तेवर आणलेलं आहे. हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. त्यामुळे अशा प्रकारची हिंमत कुणी केली तर आमचं सरकारही तिसरा डोळा उघडेल. एवढंच मी सांगू इच्छितो, असेही त्यांनी सांगितले.
नितेश राणे पुढे म्हणाले की, सध्या भाषेवरून निर्माण झालेला वाद हा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रकार आहे. या देशाला इस्लामिक देश बनवण्याचं हे कटकारस्थान आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद अशी नाटकं करून आमच्या हिंदूंची संख्या मुंबईतून कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. मुंबईतून हिंदूंचं पलायन कसं होईल, यासाठी कट रचले जात आहेत. त्यातून हिंदूंनात मारहाण केली जात आहे. मालवणीमध्ये जावा ना. ते काय एकदम शुद्ध मराठीत बोलतात काय? तिथे जाऊन मारहाण का करत नाहीत? त्यामुळे अशा प्रकारे हिंदूंवर कुणी दादागिरी केली तर त्यांच्यावर आमचं सरकार कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.