"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 20:29 IST2025-05-01T20:28:30+5:302025-05-01T20:29:24+5:30
जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
Caste Census: मोदी सरकारने बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. कॅबिनेट बैठकीमध्ये केंद्र सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. सीसीपीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. मोठ्या कालावधीपासून विविध संघटना आणि विरोधी पक्षांकडून जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. या निर्णयाचे काही विरोधकांनी स्वागत केले. पण काहींनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना सवाल केला.
गळाकाढू काँग्रेसी गप्प का?
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे", असे रोखठोक मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.
राज्यभर अभिनंदनाचे ठराव
पुढे ते म्हणाले, "जातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी व ऐतिहासिक असल्याने महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्यावतीने पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात येणार आहे. या क्रांतिकारी निर्णयाबद्दल महाराष्ट्र भाजपाने राज्यातील एक लाख १८६ बूथ आणि १,२८० मंडल समित्यांसह महाराष्ट्रातील २७ हजार ग्रामपंचायतींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व जातनिहाय जनगणनेमुळे सुरू होईल. जातनिहाय जनगणना लोकशाही मजबूत करणारा महत्तम टप्पा असून, पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्याध्येयपूर्तीची पाऊलवाट अधिक पक्की होईल ही खात्री आहे," असा विश्वास वाबनकुळे यांनी व्यक्त केला.