वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:26 AM2019-10-29T00:26:34+5:302019-10-29T06:28:12+5:30

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत

On whose path is the social engineering of the underprivileged? | वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत

वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत

Next

धनाजी कांबळे

पुणे : वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला मिळालेली ४१ लाख मते अनेकांची डोकेदुखी ठरली होती. तीच स्थिती विधानसभेला देखील दिसून आली. विशेषत: वंचितने सर्वहारा, शोषित घटकांना सोबत घेऊन केलेले सोशल इंजिनिअरिंग यशस्वी होत असल्याचे दिसत असले तरी हे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर पडले, याचे चिंतन आता ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या जय-पराजयामध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ५० ते ६० मतदारसंघांत मोठी लढत दिली असून, यापैकी २० ते २५ मतदारसंघांत वंचितच्या उमेदवारांची मते अनेकांच्या गडांना हादरे देणारी ठरली आहेत. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये ४० ते ५० हजारांहून मते घेऊन वंचितने ताकद दाखवून दिली आहे.

वंचितमध्ये सहभागी असलेल्या दलित, ओबीसी, धनगर, अल्पसंख्याक, गरीब मराठा, लिंगायत अशा सर्व समूहांना एकत्र घेऊन एकजातीय ते सर्वसमावेशक अशी पक्षबांधणी केली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत लोकप्रिय, धनदांडग्या उमेदवारांना प्राधान्य न देता सर्वसामान्य माणसाला सत्तेत घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष जागा मिळण्यात काही परिणाम दिसून आलेला नाही.

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत. मात्र, साधारण दहा ते बारा मतदारसंघांत वंचितचे उमेदवार पंधराव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. १७ जागांवर काँग्रेस, ७ जागांवर भाजप, १४ जागांवर शिवसेना, ११ ठिकाणी राष्ट्रवादी, १० जागांवर अपक्ष, १ जागेवर एमआयएम आणि एका शेकापच्या जागेवर वंचितने उपद्रवमूल्य दाखवून मतांमध्ये आघाडी घेतलेली दिसते. मतांची प्रातिनिधिक आकडेवारी पाहता वंचितला कमी कालावधीत जनतेने दिलेला पाठिंबा म्हणजे आंबेडकरांनी केलेले सोशल इंजिनिअरिंग वंचित, शोषित घटकांना सत्तेत घेऊन जाऊ शकते, असा विवास देणारे आहे. स्वखर्चाने भाजी-भाकरी बांधून सभेला जमलेल्या मतदारांना सत्तेत जाण्याचे स्वप्न पाहण्याची दिशा देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

पक्षबांधणीवर लक्ष देणे गरजेचे
दलित-बहुजन राजकारणाची घडी विस्कटलेली असताना आंबेडकरांसोबत असलेली जनता मोठ्या प्रमाणात आहे. त्याला स्वाभिमानी नेता, बाबासाहेबांचे नातू, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, वैचारिक धारिष्ट्य या जमेच्या बाजू त्यांच्याकडे आहेत. सत्तेच्या लढाईत तडजोड महत्त्वाची मानली जाते. आंबेडकरांनी समविचारी पक्ष, संघटनांसोबत आघाडी केल्यास वंचितचे प्राबल्य वाढू शकते. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी हा भक्कम पर्याय अधिक व्यापक करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.

Web Title: On whose path is the social engineering of the underprivileged?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.