कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
By अतुल कुलकर्णी | Updated: December 28, 2025 10:17 IST2025-12-28T10:16:55+5:302025-12-28T10:17:57+5:30
...हा समज घेऊन आम्ही बाहेर कोणाशी बोलायला जावे तर कोणाच्या तंगड्या कोणाच्या गळ्यात हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही जरा विस्कटून सांगितले तर बरे होईल असे म्हणत आम्ही काही लोकांशी संवाद साधला. त्यावरून तुम्हाला काही समजले तर आम्हाला समजावून सांगा... तो संवाद जशास तसा इथे देत आहे...

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
नेतेमंडळी, नमस्कार...
राज्यात भाजप, शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि अन्य पक्ष विरोधात आहेत, असा आमचा समज आहे. हा समज घेऊन आम्ही बाहेर कोणाशी बोलायला जावे तर कोणाच्या तंगड्या कोणाच्या गळ्यात हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही जरा विस्कटून सांगितले तर बरे होईल असे म्हणत आम्ही काही लोकांशी संवाद साधला. त्यावरून तुम्हाला काही समजले तर आम्हाला समजावून सांगा... तो संवाद जशास तसा इथे देत आहे...
- दिनकरराव, दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये तुम्ही जोरजोरात ढोल वाजवून राज आणि उद्धव एकत्र आल्याचे स्वागत करत होता. मनसे आता भाजपचा सुपडा साफ करेल असे म्हणत होतात तुम्ही... आणि दुसऱ्या दिवशी सांगता मी भाजपसोबत आहे..!
हो पण ती कालची गोष्ट होती. आज मी भाजपसोबत आहे. आता मनसेचा सुपडा साफ करू.
- पण परवा तर तुम्ही भाजपला पक्ष फोडणारा, माणसं फोडणारा, घर तोडणारा पक्ष असं म्हणत होता. आज एकदम उपरती कशी झाली..?
माझा विकास करायचा असेल तर तो भाजपमध्येच होऊ शकतो, असे स्वप्न मला पहाटे पडले. मी खडबडून जागा झालो. मला मागचे काही विचारू नका. आज मी भाजपसोबत आहे..!
- म्हणजे उद्या तुम्ही कोणासोबत असाल..? उद्या स्वप्नात उद्धव ठाकरे आले तर...?
स्वप्न कसे पडते त्यावर अवलंबून आहे. जर ते माझा विकास करतो म्हणाले तर मी उद्या त्यांच्यासोबत जाऊ शकतो..?
- अहो पण ज्या लोकांनी तुमच्याकडे आणि तुमच्या पक्षाकडे बघून मतदान केले असेल ना...
मतदान केले की त्यांचे काम संपले. त्यांनी जास्त आगाऊपणा करायचा नाही. वाजव रे ढोल... (ढोलच्या तालावर गुटगुटीत दिनकरराव मस्त नाचू लागतात)
- दादा, पुण्यातले आपल्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते भाजपसोबत नाहीत का..?
मला काही माहिती नाही... सुप्रियाला विचारा... ती काकांशी बोलून सांगेल...
- पण दादा पक्ष तर तुमचा आहे ना..? काका-पुतणे एकत्र येणार अशा बातम्या छापून येत आहेत.
त्या मीडियावाल्यांना नाहीत कामधंदे...
- असे म्हणून प्रश्न सुटेल का दादा... आपला पक्ष नेमका कोणासोबत आहे? काका-पुतणे एकत्र येणार आणि भाजपविरोधात निवडणूक लढवणार अशी अख्ख्या पुण्यात चर्चा आहे.
चर्चा तर होणारच... नाहीतरी पुण्यातल्या लोकांना चर्चा करायला फार आवडते.
- पण दादा तुम्ही सत्तेमध्ये भाजपसोबत आहात. निवडणुकीत भाजपच्या विरोधात कसे..? तुम्ही तरी जरा विस्कटून सांगा...
तुम्हाला सांगायला आम्ही बांधील नाही. आमचं काय करायचं आम्ही बघू... आम्ही पण दानवांना उत्तर द्यायला बांधील नाहीत. जे बोलायचे ते ‘देवा’ला बोलू...
- साहेब, हा आपला हाडाचा कार्यकर्ता आहे... त्याला तिकीट दिले पाहिजे असे वाटत नाही का..?
न वाटायला काय झाले. त्याला गुवाहाटीला जायचे विमानाचे तिकीट देतो. खुश होईल तो...
- पण साहेब त्याला नगरसेवकापदाचे तिकीट पाहिजे. एकदा का तिकीट मिळाले की तोदेखील स्वबळावर अनेकांना गुवाहाटीची तिकिटे काढून देईल की...
बिलकुल नाही. सध्या आपल्या पक्षाच्या महामंत्र्यांच्या बायकोला, खासदाराच्या भावाला, आमदाराच्या पोराला तिकीट द्यायचे आहे. नगरपरिषदेला वामनरावच्या घरात आपण सहा जणांना तिकिटे दिली. तसेच आता आपल्या प्रत्येक नेत्याच्या घरात नातेवाइकांना तिकिटे द्यायची आहेत...
- पण मग कार्यकर्त्यांनी काय करायचे...? सतरंजी उचलणाऱ्यांची पार्टी असा नवीन पक्ष काढला तर...?
हा हा हा... पार्टी काढायला पैसे लागतात. ती चालवायला पैसे वाटावे लागतात... ते तर फक्त माझ्याकडेच आहेत... ते फक्त मीच करू शकतो...
- ही सगळी चर्चा ऐकून, आम्ही चहाच्या टपरीवर गेलो... त्यावेळी तेथे आरती प्रभूंचे गाणे सुरू होते... गाणे ऐकता ऐकता आम्ही ढसाढसा रडू लागलो... ५० वर्षांनंतर तंताेतंत खरे ठरेल, असे गाणे आरती प्रभूंना १९७३-७४ मध्ये कसे सुचले असेल या विचारानेच आम्ही अचंबित झालो... रेडिओवरचे गाणे आमचे काळीज पिळवटून टाकत होते...
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे
दीप सारे जाती येथे विरून विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे...
- तुमचाच, बाबूराव