लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- सीबीआयने नाशिक जिल्ह्यातील २ बोगस कॉल सेंटर उध्वस्त करून दाखल केलेल्या गुन्ह्यात अनोळखी सरकारी सेवक यांचा देखील आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. तर माध्यमातील बातम्यां नुसार सदर बोगस कॉल सेंटर चालवण्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्याचे व त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात असल्याचे व त्यात मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या तत्कालीन बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते बडे पोलीस अधिकारी कोण? याची चर्चा सुरु आहे.
सीबीआयने नाशिकच्या इगतपुरी आणि अन्य एका भागातील बोगस कॉल सेंटर उध्वस्त करत ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. येथून ब्रिटन आदी परदेशातील नागरिकांना बोगस विमा पॉलिसी च्या आड ऑनलाईन ठकवले जात होते. सीबीआय ने दाखल केलेल्या गुन्ह्यात काही अनोळखी सरकारी सेवकांचा देखील आरोपीं मध्ये समावेश केला आहे.
दरम्यान अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक बडे पोलीस अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात हप्ता दिला जात होता. ते बडे अधिकारी बदली होऊन दुसरीकडे गेले तरी त्यांच्या नव्या हद्दीत बोगस कॉल सेंटर सुरु करा म्हणून आग्रह धरत होते. त्यात पालघर, रायगड जिल्ह्यासह मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेतील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाची माहिती देखील आरोपींनी सीबीआय अधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशीत दिल्याच्या माध्यमातील वृत्ताने खळबळ उडाली आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाशी संबंधित असलेले ते बडे अधिकारी यांची बदली झाल्याचे तर काही अजूनही आयुक्तालयात असल्याची चर्चा होत आहे. सीबीआय ह्या बड्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यासह अटक करणार का ? असा प्रश्न एकीकडे केला जात असून ह्या बाबत राज्याचे पोलीस महापसंचालक पासून गृह विभाग आणि मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त चौकशी लावणार का? या कडे देखील जागरूक नागरिकांसह अनेक पोलीस अधिकारी - कर्मचारी यांचे लक्ष लागले आहे.
ह्या आधी आयुक्तालयाच्या हद्दीत आणि पूर्वी ठाणे ग्रामीण असताना देखील बोगस कॉल सेंटर वर धाडी टाकून गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे बड्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाशिक बोगस कॉल सेंटर कनेक्शन च्या अनुषंगाने पूर्वीच्या धाडींची आणि पुढील तपासाच्या प्रगतीची चौकशी सीबीआय वा पोलिसां कडून होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या कडे लोकमतच्या प्रतिनिधीने सदर प्रकरणी माहिती जाणून घेतली असता त्या बड्या जबाबदार अधिकाऱ्याने सीबीआय काय कार्यवाही करते ते आधी बघू अशी वेट अँड वॉचची भूमिका बोलून दाखवली.