बाबासाहेबांच्या रूपाला पोर्ट्रेटच नव्हे, विचारांच्या प्रतीकांमध्ये जिवंत करणारा चित्रकार कोण?
By सुमेध वाघमार | Updated: October 1, 2025 07:59 IST2025-10-01T07:58:45+5:302025-10-01T07:59:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या केवळ तीन वर्षाच्या आतच (१९५९) गुलाबराव एस. नागदेवे या अवलिया चित्रकाराने रात्रंदिवस मेहनत करून अशी तैलचित्रे साकारली, जी आज ६६ वर्षानंतरही कोट्यवधी लोकांच्या मनामध्ये विचारांचे स्फुल्लिंग चेतवत आहेत.

बाबासाहेबांच्या रूपाला पोर्ट्रेटच नव्हे, विचारांच्या प्रतीकांमध्ये जिवंत करणारा चित्रकार कोण?
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या केवळ तीन वर्षाच्या आतच (१९५९) गुलाबराव एस. नागदेवे या अवलिया चित्रकाराने रात्रंदिवस मेहनत करून अशी तैलचित्रे साकारली, जी आज ६६ वर्षानंतरही कोट्यवधी लोकांच्या मनामध्ये विचारांचे स्फुल्लिंग चेतवत आहेत. तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाला केवळ पोर्ट्रेटमध्ये नव्हे, तर आंबेडकरी विचारांच्या धगधगत्या प्रतिकांमध्ये त्यांनी जिवंत केले आहे. त्यांच्या कलाकृती म्हणजे केवळ रंगरेषा नसून, त्या मानवमुक्तीच्या संघर्षाची अजरामर साक्ष आहेत. स्वःता पडद्याआड राहून समाजाला एक अमूल्य ठेवा देणाऱ्या या निःस्वार्थ कलावंताची ही केवळ कला नाही, तर प्रेरणा आणि क्रांतीचा जिवंत वारसा आहे. नागदेवे यांच्या चित्राने बाबासाहेबांचे प्रभावी रूप आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे.
तैलचित्र तातडीने पाठविले लंडनला
नागदेवे यांनी काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक पोर्ट्रेट १९७० मध्ये थेट लंडनच्या 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मध्ये पोहोचले. यासाठी 'डॉ. आंबेडकर मेमोरियल कमिटी ऑफ ग्रेट ब्रिटन'ने पुढाकार घेतला.
त्यावेळचे स्मारक समितीचे अध्यक्ष रा. सु. २ गवई यांच्या विनंतीवरून नागदेवेंनी पांढऱ्या सूटमधील आणि हाती संविधान असलेले पोर्ट्रेट तयार केले. हे तैलचित्र ओले असतानाही तातडीने लंडनला पाठविण्यात आले होते. या पोर्ट्रेटवर २३ ऑक्टोबर १९७० अशी तारीख असून, खाली जी. एस. नागदेवे अशी त्यांची स्वाक्षरी आहे.