CM Devendra Fadnavis: राजकीय नेत्यांची पुढची पिढी राजकारणात येण्याचे प्रकार आता सर्रासपणे पाहायला मिळतात. एखाद्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी राजकारणात आली नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जावं, इतके राजकीय घराणेशाहीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातही अशी अनेक उदाहरणे असल्याने राज्याचे विद्यमान मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची पुढची पिढी राजकारण येणार की नाही, याबाबत अधूनमधून चर्चा होत असते. या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राजकीय वारसदाराबाबतच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अनेकांना माझ्या राजकीय वारसदारांची चिंता असते, पण मी माझ्या घराण्यातला शेवटचा राजकारणी असेन," असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. महिला सुरक्षिततेसाठी सार्वजनिक सुविधा
"महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महामार्गांवर प्रत्येक ५० किमी अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, त्यांचे दीर्घकालीन व्यवस्थापन आणि देखभाल करण्यासाठी ठोस योजना आखण्यात आली आहे. शालेय जीवनापासून लैंगिक समानता (जेंडर इक्वॅलिटी) बिंबवली पाहिजे. स्त्रियांचा आदर करणे, सन्मान करणे या बाबी लहान वयातच रुजवल्या पाहिजेत. ही जबाबदारी त्यांची शाळा, परिवार आणि समाजाचीदेखील आहे," असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, यावेळी लव्ह जिहाद प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले की, "सुरुवातीला अशा घटना एक-दोन अपवाद म्हणून वाटत होत्या, पण तपासानंतर लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणावर चाललेला प्रकार आहे. अनेक मुली फसवल्या जात असून, त्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांची विशेष समिती तयार केली असून, त्यांना या प्रकरणांचे सखोल विश्लेषण करण्याचे निर्देश दिले आहेत," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.