बारामतीचा लेक होणार फलटणचा जावई; अजित पवारांची भावी सून अन् जयची पार्टनर कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 14:21 IST2025-03-14T14:20:21+5:302025-03-14T14:21:29+5:30
अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा जय पवार यांनीच सांभाळली होती. गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता.

बारामतीचा लेक होणार फलटणचा जावई; अजित पवारांची भावी सून अन् जयची पार्टनर कोण आहे?
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मुलाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. अजितदादांचे पुत्र जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. बारामतीचा हा लेक आता फलटणचा जावई होणार असून येत्या १० एप्रिलला जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा आहे. जय आणि ऋतुजा यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात ज्येष्ठांच्या आशीर्वादापासून झाली आहे. जय आणि ऋतुजा यांनी पवार कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि नात्याने आजोबा असलेल्या शरद पवारांची भेट घेतली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जय आणि ऋतुजा यांना नवीन नात्याच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून जय आणि ऋतुजा यांचा फोटो शेअर केला. त्यानंतर जयचं लग्न ठरल्याची बातमी समोर आली. आत्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील या कौटुंबिक सोहळ्याची गुडन्यूज सर्वांना दिली. जय आणि ऋतुजा यांनी पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी जात आजोबा आणि आजी प्रतिभा पवार यांची भेट घेतली.
कोण आहेत अजित पवारांची भावी सून?
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं ऋतुजा यांच्याशी लग्न होणार आहे. ऋतुजा यांचं पूर्ण नाव ऋतुजा पाटील असं आहे. त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मिडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून मागील काही वर्षापासून जय पवार आणि ऋतुजा यांच्यात ओळख झाली होती. त्याशिवाय ऋतुजा पाटील यांची बहीण केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटील यांच्या सूनबाई आहेत.
दरम्यान, जय पवार हे अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच चर्चेत आले होते. अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा जय पवार यांनीच सांभाळली होती. गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता. जय पवार यांनाच बारामतीतून उभे केले जाणार अशीही बातमी माध्यमात झळकली होती. जय पवार यांनी दुबईत काही काळ व्यवसाय सांभाळल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर जय पवार पक्षाच्या बैठकींना, प्रचाराला हजेरी लावू लागले होते.