संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:49 IST2024-12-16T12:47:44+5:302024-12-16T12:49:42+5:30
Devendra Fadnavis santosh deshmukh sarpanch: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. पहिल्याच दिवशी विधानसभेबरोबर विधान परिषदेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर मुद्दे उपस्थित करत यावर सरकारने भूमिका मांडण्याची मागणी केली. दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.
अंबादास दानवे काय म्हणाले?
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, जे कोणी आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्यांना पोलीस जर सहकार्य करत असतील, तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगारांचं याबद्दलचा खुलासा झाला पाहिजे", अशी भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडली.
कोणावर कारवाई केली? देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बीड जिल्ह्यात मस्साजोगला जी काही घटना झालीये, ती गंभीर आहे. एका तरुण सरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला. निश्चित ही घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. यासंदर्भात तिथल्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे."
"त्यावेळी जो पदभार असलेला पोलीस निरीक्षक आहे, त्याला निलंबित करण्यात आलेले आहे. तीन आरोपींना अटक केलेली आहे. काही आरोपी अद्याप फरार असले, तरी त्यांना शोधून काढून त्यांनादेखील अटक करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी-एसआयटीकडे
"मी विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की, आरोपी कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, धर्माचा; कुठली भाषा बोलतो. कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेत सहभागी असेल, अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल. याकरिताच हे प्रकरण सीआयडी क्राईमकडे पाठवण्यात आली आहे. तिथे एक विशेष एसआयटी तयार करायला सांगितली आहे. त्या एसआयटीमार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कुणी असतील, त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
"या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जातं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतो. अशा मंत्र्यांवरदेखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो. त्यामुळे मला वाटतं की, सरकारवर सरकारी पक्षातील, विरोधी पक्षातील कोणाचाही दबाब आरोपीला वाचवा, असा आलेला नाही. आम्ही यामध्ये टेक्निकल आणि आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करू", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्या पोलिसांनी कामचुकारपणा केला, जाणीवपूर्वक केलं असेल, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. आणखी कोणी यात सापडला, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल", असे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केले.