- सुकृत करंदीकर-
वर्षभरापूर्वीची घटना आहे. शिवसेनेचा कार्यक्रम होता. त्यात आदित्य ठाकरे यांच्या एकूण वयापेक्षाही जास्तीची राजकीय कारकीर्द असलेल्या एका शिवसेना खासदाराने आदित्य यांचे जाहीरपणे पाय धरले. त्याची खूप चर्चा झाली. अर्थातच शिवसेनेत नसलेल्यांना या गोष्टीचं जास्त अप्रुप वाटलं. शिवसैनिकांना यात फार काही वावगं वाटलं नव्हतं. कारण स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनीच सात वर्षांपूर्वी शिवसैनिकांकडून जणू ही बाब वदवून घेतली होती. उद्धव आणि आदित्यला तुमच्या हवाली करतोय, असा आदेश बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिला होता. या एकाच आदेशाने बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भावी नेतृत्वाचा प्रश्न निकाली काढला होता. ठाकरे घराण्याची तिसरी पिढी शिवसेनेवर राज्य करणार, हे बाळासाहेबांनीच ठरवून दिलेलं सूत्र आहे. याला कोणत्याही वयाच्या आणि राजकीयदृष्ट्या कितीही ताकदवान शिवसैनिकानं आक्षेप घेतला नव्हता. पाठीराख्यांचाच आक्षेप नसल्यावर मग पक्षांतर्गत घराणेशाही असावी की नसावी या प्रश्नाला काही काही अर्थ उरत नसतो. शिवसैनिकांनी आदित्य यांचं नेतृत्त्व कसलीही खळखळ न करता सहजी स्विकारलं आहे. बाळासाहेब, उद्धव यांच्या बरोबरीनं आदित्य यांचं छायाचित्र शिवसेनेच्या नेते-कार्यकर्त्यांकडून आता सर्रास झळकावलं जातं. प्रामुख्यानं भावनेच्या बळावरच ज्या पक्षाची आजवरची वाटचाल झाली त्या पक्षात हा घटनाक्रम अनपेक्षित नाही.
शिवसेनेत नेता हे पद महत्त्वाचं असतं. चार-पाच वर्षांपुर्वी युवा सेनेच्या अधिवेशनात बोलताना आदित्य यांनी बाळासाहेबांचं सूत्र बदलण्याची भाषा केली होती. बाळासाहेबांनी ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण सांगितलं. हे टक्के मी वाढवतोय. शिवसैनिकांनी १०० टक्के राजकारण करावं. १०० टक्के राजकारण केल्याशिवाय १०० टक्के समाजकारण करता येणार नाही, असं आदित्य म्हणाले होते. त्यांचं विधान चमकदार होत. विशेष म्हणजे त्यांना अपेक्षित असलेल्या शंभर टक्के राजकारणाची सुरुवात आदित्य स्वत:पासून करणार आहेत. थेट कृती करुन.
त्या अर्थाने आदित्य यांच्या राजकारणातल्या अधिकृत प्रवेशाला आता नऊ वर्षं पूर्ण झाली. यशासारखं दुसरं काही नसतं. त्यांच्या या अल्प कारकिर्दीत दोन लोकसभा, एक विधानसभा, मुंबई महापालिका, मुंबई विद्यापीठाची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक असं मोठं यश शिवसेनेला मिळत गेलं. या प्रत्येक यशात आदित्य यांचा मोठा वाटा असल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे. पर्यावरण, प्लास्टीक बंदी, मुंबईतलं नाईट लाईफ, रुफ टॉप हॉटेल, व्हॅलेंटाईन, ओपन जीम किंवा राणीच्या बागेतले पेंग्विन, मेट्रो मार्ग आदी विषयांवर भूमिका घेत आदित्य यांनी त्यांचा 'शहरी कल' स्पष्ट केला आहे. याला त्यांच्या मयार्दा म्हणायच्या की लक्ष्य निश्चित करुन चालवलेले प्रयत्न म्हणायचे याची उत्तरं अजून स्पष्ट झालेली नाहीत. मात्र एका बाबतीत मात्र आदित्य यांनी निराशा केली, असं ठामपणे म्हणता येईल. ती म्हणजे जनसंपर्क आणि प्रवास. मुंबई-ठाणे आणि नाशिक-पुणे या चौकोनाच्या पलीकडे त्यांची गाडी सरकताना दिसत नाही. ह्रदय शस्त्रक्रियेनंतर उद्धव यांच्या हालचालींवर मर्यादा आलेल्या आहेत. या स्थितीत महाराष्ट्र उमजून घेण्याची संधी आदित्य यांच्यापुढं आहे. शिवसैनिकांनी नेतृत्त्व स्विकारल्यानंतर जी धडाडी त्यांनी दाखवायला हवी तशी अजून प्रकट झालेली नाही. निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं काढलेल्या यात्रांमधला 'जनसंवाद' घडवून आणलेला होता. त्यातून आदित्य यांची प्रतिमा महाराष्ट्रात ठसली, असं म्हणता येत नाही.
कोल्हापुर वगळता पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचं स्थान नगण्य आहे. पुण्यासारख्या राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक अवस्था दयनीय आहे. मुंबई, कोकण, नाशिक, कोकण आणि मराठवाड्यात असं शिवसेनेचं अस्तित्त्व बेटांसारखं विखुरलेलं आहे. शिवसेनेच्या गेल्या ५२ वर्षांच्या इतिहासात दोनदाच या पक्षाला राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचता आलं. सत्ता असताना संघटना वाढवणार नाही तर केव्हा? आदित्य कधी सेलेब्रिटींच्या गराड्यात दिसतात, कधी मुंबई-नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिसतात.
आयतं वाढलेलं ताट मिळतं हा जसा घराणेशाहीचा फायदा असतो तसा एक तोटाही असतो. पुवासुर्रींशी सतत होणाºया तुलनेला तोंड द्यावं लागतं. अपेक्षा बाळगल्या जातात ते इतिहासातल्या कर्तुत्वाकडे पाहात. बाळासाहेब ठाकरेंची भाषा, भूमिकांमधला बेधडकपणा, नेते-अभिनेते-उद्योगपती-साहित्यीक आदींचा त्यांचा बहुआयामी गणगोत, राजकारणात कमावलेली जरब यासारख्या अनेक गुणांच्या आधारे उद्धव यांची कारकिर्द जोखली जाते. खास करुन स्वाभिमानाचा मुद्दा सन २०१४ पासून सातत्याने ऐरणीवर आहे. सत्तेत राहायचं आणि सत्ताधारी भागीदारावर रोज उठून टिकाही करायची, याला शिवसेनेचा सत्तालोलुपपणा म्हटलं गेलं. २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या बाबतीत भाजपनं शिवसेनेला मागं टाकलं आणि युतीमधल्या थोरल्या भावाची जागा आणि मान भाजपनं शिवसेनेकडून हिसकावून घेतला. बाळासाहेब ठाकरे असते तर हे धाडस भाजपनं दाखवलं असतं का आणि तसं दाखवलं असतं तर बाळासाहेबांनी ते सहन केलं असतं का, या प्रश्नाचं उत्तर उद्धव यांना देता आलेलं नाही. उद्धव यांच्यानंतर आदित्य यांच्याकडं शिवसेनेची सूत्रं येणार आहेत. त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवावं लागणार आहे. आदित्य यांच्या वयामुळं शिवसेना वगळता उर्वरीत पक्ष त्यांना अजूनही गांभीर्यानं घेत नसल्याचं वास्तव आहे.
समाजाच्या सर्व स्तरात पोहोचण्याचं भलमोठं आव्हान आदित्य यांच्यापुढं आहे. राजकीय सत्ता मिळवण्याचं यशापयश अनेक मुद्द्यांवर अवलंबून असतं. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणातलं, समाजकारणातलं प्रभाव केंद्र बनण्याचं ध्येय आदित्य यांना ठेवावं लागेल. त्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे राज्याच्या सत्तेत जेमतेम पाच वर्षंच होते पण त्यांचा प्रभाव आजही शिवसेनेच्या रुपानं जिवंत आहे. बाळासाहेब राष्ट्रीय स्तरावर पोचले, एवढंच काय पाकिस्तानपर्यंत स्वत:ची ओळख त्यांनी पोहोचवली. बाळासाहेबांची 'आरे ला कारे' करणारी शिवसेना मवाळ केल्याचा आरोप अंगावर घेत उद्धव यांनी वाटचाल केली. या ठाकरी परंपरांचं ओझं बाळगून आदित्य यांना पुढं जायचं आहे. तरुणाईची भाषा आणि तिच्या आकांक्षांना-भावनांना हात घालण्याचं कसब बाळासाहेबांना साधलं होतं. त्या शिदोरीवरच उद्धव यांची कारकीर्द पुढे सरकरली. आताची तरुणाई पुर्वपूण्याईला फार भुलत नाही. राष्ट्रीय पातळीवर राहूल गांधींनी याचा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्राचं राजकीय अवकाश व्यापण्याची स्पर्धा अत्यंत तीव्र होत असताना आदित्य यांना वैयक्तीक आणि शिवसेनेचा प्रभाव वाढवण्याचं शिवधनुष्य पेलायचं आहे. वरळीतली विधानसभा निवडणूक ही तर केवळ सुरुवात आहे. ------(समाप्त)-----