भाजपासोबत जिथं युती होणार नाही, तिथं...; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:14 IST2025-01-08T17:11:52+5:302025-01-08T17:14:43+5:30
ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला काम केले आहे. त्यांनाही स्थान देणे आवश्यक असते असं गोऱ्हे यांनी सांगितले.

भाजपासोबत जिथं युती होणार नाही, तिथं...; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान
पुणे - मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाशिवसेना युती व्हावी असा आमचा प्रयत्न असणार आहे. इतर सर्व महापालिका निवडणुकीत युती व्हावी असं आम्हाला वाटतं. परंतु ज्याठिकाणी काही कारणास्तव युती होणार नाही तिथे शिवसेनेचीही स्वबळावर लढण्याची तयारी आहे असं मोठं विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, युतीत बिघाडी वैगेरे काही नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे. मी पाचवी सहावी निवडणूक बघतेय. तरुणांची पिढी आता समोर आली आहे. ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला काम केले आहे. त्यांनाही स्थान देणे आवश्यक असते. प्रत्येक क्षेत्रात तरुण पिढी येत असते. त्यामुळे तरूण पिढीला येताच कामा नये असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं त्यांनी सांगितले.
मुंबईतील प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपाचा महापौर बसविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. पक्ष नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. त्याशिवाय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. मनपा निवडणूक स्वबळावर लढविणार असून, एक नंबरचा पक्ष म्हणून सगळ्यात जास्त नगरसेवक भाजप निवडून आणेल, त्यासाठी नियोजन सुरू आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवकच महापौर बनेल असा विश्वास छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला.
भाजप कार्यकर्ते अस्वस्थ...
‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. २०१९ पासून आजपर्यंत कार्यकर्त्यांनी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सामना केला. शिंदेसेना सोबत आल्यानंतर सत्ता मिळाली, पण त्यात कार्यकर्त्यांचे काही भले झाले नाही. मंत्री, नेत्यांच्या मागे-मागे फिरणाऱ्यांचे अडीच वर्षांत कल्याण झाले. राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत आल्यानंतरही कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. आता सत्ता आल्यामुळे काही भले होईल, या अपेक्षेत कार्यकर्ते असतानाच ठाकरेंशी हातमिळवणीची चर्चा, नवीन पक्षप्रवेशांमुळे ते पुन्हा खचले आहेत. पक्ष प्रत्येक कार्यक्रम ‘टार्गेट’ देऊन पूर्ण करून घेतो, मात्र त्या तुलनेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ‘आउटपूट’ मिळत नसल्याची भावना अनेकांनी बोलवून दाखविली.