नुसती घोषणाच; महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज, यशवंत चव्हाणांचा पुतळा कधी बदलणार?
By समीर देशपांडे | Updated: February 8, 2025 15:51 IST2025-02-08T15:50:32+5:302025-02-08T15:51:07+5:30
कोल्हापूर विमानतळाला नाव कधी देणार?

नुसती घोषणाच; महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज, यशवंत चव्हाणांचा पुतळा कधी बदलणार?
समीर देशपांडे
कोल्हापूर : नवी दिल्लीतीलमहाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत पुतळे बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात करून बरोबर सात महिने उलटले. विधानसभा निवडणुका होऊन पुन्हा सत्ता आली तरी याबाबतीत राज्य शासनाकडून काहीही हालचाल झालेली नाही.
या पुतळ्यांबरोबरच कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेली २० वर्षे होत आहे. असे असताना पुतळे बदलले का जात नाहीत आणि विमानतळाला नाव का दिले जात नाही? असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत.
महाराष्ट्र सदनातील लोकराजा शाहू आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे दोन्ही पुतळे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत आहेत, असे वृत्त ‘लोकमत’ने ४ आणि ५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केले. यानंतर याबाबत कोल्हापुरातील मान्यवरांनी आणि संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
भाजप आणि जिल्हा नागरी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठवून शासनाला पुतळा बदलणे शक्य नसल्यास कोल्हापूरकर दिल्लीतील हे पुतळे बदलतील, असा इशाराही दिला होता. याची दखल घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ५ जुलै २०२४ रोजी याबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.
मंत्री, खासदार, आमदारांनी भूमिका जाहीर करावी
या दोन्ही पुतळ्यांबाबत आणि कोल्हापूरच्या विमानतळाबाबत दोन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. उठता, बसता शाहू महाराजांचे नाव घेणाऱ्या या सर्वांनी तातडीने याबाबत शासनाला निर्णय घेणे भाग पाडून अंमलबजावणी करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.