लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:36 IST2025-11-06T09:34:56+5:302025-11-06T09:36:01+5:30
आरटीओ राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नसल्याची टीका होत आहे

लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड झाल्यानंतरही परिवहन विभागाकडून अद्याप कोणतेही सखोल ऑडिट करण्यात आलेले नाही. एनआयसी सुरक्षा सॉफ्टवेअरला चकवा देत उमेदवारांशिवाय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रकार वाढल्याचे उघड झाल्यानंतरही वैध-अवैध लायसन्सची नेमकी आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरटीओ राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नसल्याची टीका होत आहे.
परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई सारख्या शहरांमध्ये ७५ टक्के उमेदवार लर्निंग लायसन्स घरबसल्या काढतात. तर ग्रामीण भागात साधारण ३० ते ४० टक्के. आरटीओ कार्यालयांमध्ये परीक्षा देण्यासाठी उमेदवार येत नसल्याने अशात किती उमेदवार स्वतः परीक्षा देतात याची माहिती परिवहन विभागाला नसते. कारण ही संपूर्ण प्रक्रिया एनआयसीच्या पोर्टलमार्फत राबविली जात असल्याचे आरटीओचे म्हणणे आहे. एजंटकडून या प्रणालीचा गैरवापर करून परराज्यांसह नेपाळ आणि इतर देशांतील नागरिकांनाही लायसन्स दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आरटीओची बतावणी
अधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांना लर्निंग लायसन्स प्रक्रियेमध्ये होत असलेल्या गैरप्रकाराबद्दल कळवल्यावर सुधारणा करण्याची गरज असल्याचे कळवले होते. त्यानुसार किती लायन्सस चुकीच्या पद्धतीने काढले, याचे ऑडिट करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते; परंतु अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एनआयसीकडे परीक्षेचा डेटा मागितला असता तो त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी कळवले. याबाबत राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी संपर्क
झाला नाही.
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सोमवारी बैठक घेण्यात आली. आत्तापर्यंत चुकीच्या पद्धतीने किती लर्निंग लायसन्स निघालेत याची शहानिशा करण्यासाठी ऑडिट करणे आवश्यक आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री