माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 01:17 IST2025-12-19T01:16:27+5:302025-12-19T01:17:06+5:30
माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी त्यांची कोरोनरी अँजिओप्लास्टी चाचणी नियोजित आहे.

माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अटकेबाबतच्या माहितीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कोकाटे यांच्यावर शुक्रवारी मुंबईतील रुग्णालयात महत्त्वाची 'कोरोनरी अँजिओप्लास्टी' चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या अहवालानंतरच त्यांना डिस्चार्ज द्यायचा की नाही, याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत. डॉक्टरांच्या हिरव्या कंदिलाशिवाय कोकाटे यांना ताब्यात घेता येणार नसल्याने नाशिक पोलिसांचे एक पथक रात्रभर रुग्णालयातच तळ ठोकून आहे.
नेमकी काय आहे परिस्थिती?
माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी त्यांची कोरोनरी अँजिओप्लास्टी चाचणी नियोजित आहे. या चाचणीचा अहवाल काय येतो, यावर कोकाटे यांचे पुढील पाऊल अवलंबून असेल. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत रुग्णालय प्रशासनाकडून कोकाटे यांना डिस्चार्ज मिळत नाही, तोपर्यंत त्यांना कायदेशीररित्या ताब्यात घेता येणार नाही. त्यामुळे आता डॉक्टरांच्या मेडिकल रिपोर्टची वाट बघावी लागणार आहे.
रुग्णालयात पोलिसांचा पहारा
कोकाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक सज्ज झाले आहे. गुरुवारी रात्रीपासूनच हे पथक रुग्णालयात दाखल झाले असून, कोकाटे यांच्यावर निगराणी ठेवली जात आहे. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यास तातडीने पुढील कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस कोकाटे यांच्यासाठी आणि नाशिकच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
पोलिसांनी लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटे यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच आतापर्यंत कोकाटे यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराची माहिती नोंदवून घेतली आहे. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही जबाब नोंदविला आहे. उद्या शुक्रवारी कोकाटे यांची अँजोग्राफी करण्यात येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर डिस्चार्जबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत. डिस्चार्ज जोपर्यंत केला जात नाही तोपर्यंत त्यांना पोलिसांना ताब्यात घेता येत नाही. पोलिसांचे पथक मुंबईत मुक्कामी थांबलेले आहेत. कारवाई पुर्ण करून उद्या पथक नाशिकला परतणार, अशी माहिती पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.