Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:47 IST2025-12-10T16:44:24+5:302025-12-10T16:47:35+5:30
Deputy CM Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेत तुम्ही घातला खोडा, लाडक्या बहिणींनी तुम्हाला दाखवला जोडा, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
Deputy CM Eknath Shinde: पुढील निवडणुकीतही लाडक्या बहिणी तुम्हाला जागा दाखवतील. इतिहास काढून सांगा की, किती वर्ष काँग्रेसचे सरकार होते, अशी योजना कधी सुरू केली का? त्याला हिंमत लागते, धाडस लागते, लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते, ती दानत आम्ही दाखवली. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललो, ते पूर्ण करणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर टीका केली. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढायला हवी, ती कमी कशी होते, याचा अर्थ फ्रॉड झाला आहे, गडबड झाली आहे, भ्रष्टाचार झाला आहे, चुका झाल्या आहेत, राजकारणासाठी, मतांसाठी, महाराष्ट्र राज्य लुटण्याचे तुम्ही काम केले. तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही, म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो, या शब्दांत ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.
न्यायालयानेही चपराक देत परत पाठवले
लाडकी बहीण योजनेवरील लक्षवेधी संदर्भात अदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिले आहे. ही योजना सुरू केली, तुम्ही न्यायालयात गेलात. अनिल वडपल्लीवार कोणाचा समर्थक होता. तो नाना पटोले यांचा समर्थक होता. ही योजना घोषित झाल्यापासून तुम्ही टीका करत आहात आणि आता लाडक्या बहिणींवर अन्याय झाल्याच्या बाता करत आहात. योजना बंद होण्यासाठी न्यायालयात गेले, पण न्यायालयानेही त्यांना चपराक देत परत पाठवले. ही योजना फसवी आहे, चुनावी जुमला असल्याचा दावा तुम्ही केला. आचारसंहिता लागल्यावर पैसे कसे देणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर आम्ही या योजनेचे आगाऊ पैसे दिले. जरा सत्य ऐका, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला.
योग्य वेळ आली की, आम्ही जे काही आश्वासन दिले आहे, ते सगळे पूर्ण करणार
आम्ही चांगल्या भावनेतून आणि भूमिकेतून लाडकी बहीण योजना सुरू केली. आम्ही डोके लावून काम केले. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. असे लँडस्लाइड मँडेट दिले की, सगळ्यांनी पाहिले. लाडकी बहीण योजना कमी होईल, बंद होईल, असे दावे केले जात आहेत, तरी मी तुम्हाला सांगतो की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्ही २१०० रुपयांचा मुद्दा काढलात, योग्य वेळ आली की, आम्ही जे काही आश्वासन दिले आहे, ते सगळे पूर्ण करणार. लाडकी बहीण योजनेत तुम्ही खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनी तुम्हाला जोडा दाखवला, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.