आता नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 07:00 AM2020-01-17T07:00:00+5:302020-01-17T07:00:06+5:30

शंभरावे नाट़्य संमेलन मुंबईला होणार..?

When will the date declare of Natya sammelan ? | आता नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार?

आता नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार?

googlenewsNext
ठळक मुद्देसंमेलनाच्या आयोजनासाठी किमान दोन ते महिन्याचा कालावधी लागणार अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी  एप्रिल-मे महिनाच उजाडणार

पुणे : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  ‘सूप’ वाजले. आता शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार? असा प्रश्न नाट्यवर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे. संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी अद्यापही संमेलनाचे स्थळ आणि तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. आता नवीन सरकार देखील अस्तित्वात आले आहे. मग घोडं नक्की अडलंय कुठं ? इतका विलंब का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. 
दरवर्षी साहित्य संमेलनानंतर रसिकांना नाट्य संमेलनाचे वेध लागतात.  जानेवारीमध्ये साहित्य संंमेलन झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात नाट्य संमेलनाचे  ‘बिगुल’ वाजते. मात्र जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होणा-या नाट्य संमेलनाला एप्रिल किंवा जूनमधला मूहुर्त लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. 97 वे नाट्य संमेलन उस्मानाबादला एप्रिलमध्ये म्हणजे ऐन उन्हाळाच्या हंगामात झाले तर 98 वे नाट्य संमेलन हे मुलुंड मध्ये पावसाळ्याच्या दिवसात जूनमध्ये रंगले. गतवर्षी नागपूर येथे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली 99 वे नाट्य संमेलन पार पडले. हे संमेलन जरी अपवाद ठरले असले तरी यंदाच्या वर्षी पुन्हा नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी एप्रिल किंवा त्यानंतरचाच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. कारण शंभराव्या नाट्य संमेलनाच्या तारखा आणि स्थळचं अद्याप घोषित झालेले नाही. 2019 मध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका नाट्य संंमेलनाला बसला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उस्मानाबाद शाखेने अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे स्थळ आणि तारखा निश्चित करून सरकारकडून संंमेलनासाठीचे 50 लाख रूपयांचे अनुदान पदरात पाडून घेतले. मात्र ही तत्परता मध्यवर्ती नाट्य परिषदेला दाखविता आली नव्हती.  स्थळ आणि तारखाच जाहीर झाल्या नसल्याने सरकारकडे अनुदानाचा प्रस्तावच पाठवता आला नाही. या सर्व घडामोडी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्येच होणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे  सत्ता स्थापनेचे घोंगडे भिजत पडले. त्यामुळे नाट्य संंमेलनाच्या आयोजनासाठी पैसा आणायचा कुठून?मग संमेलन कुणाच्या जीवावर करणार? अशी परिषदेची गोची झाली.  
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रीमंडळ कार्यान्वित झाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रीपदाची धुरा युवा नेते अमित देशमुख यांच्याकडे आली आहे. मात्र जोपर्यंत स्थळ आणि तारखा निश्चित केल्या जात नाहीत तोवर 50 लाख रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवता येणार नाही.  यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने तात्काळ पावले उचलली तरी संमेलनाच्या आयोजनासाठी किमान दोन ते महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदाही  अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी  एप्रिल-मे महिनाच उजाडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 
-------------------------------------------------------------------
डिसेंबर महिन्यात झालेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत शंभरावे नाट्य संमेलन मुंबईला द्यावे आणि 101 वे संमेलन हे पुण्याला घेण्यात यावे. तसेच त्यावर्षीच्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मोहन जोशी यांना देण्यात यावे असे ठरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत येत्या 22 जानेवारीला चित्र पुरेसे स्पष्ट होईल. 

..............................

’ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तारखा आणि स्थळ घोषित करण्यासाठी येत्या 22 जानेवारीला सर्वसाधारण सभा आणि कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे- मंगेश कदम, प्रवक्ता, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

Web Title: When will the date declare of Natya sammelan ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.