‘त्या’ उद्योगात महिलांना आरक्षण कधी?

By admin | Published: July 16, 2016 03:17 AM2016-07-16T03:17:37+5:302016-07-16T03:17:37+5:30

खासगी उद्योगांमधील नोकरीत महिलांना आरक्षण कधी मिळेल, असा थेट सवाल औंध येथील रोहिणी राऊत हिने विचारला, तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी काय

When was the reservation of women in 'that' industry? | ‘त्या’ उद्योगात महिलांना आरक्षण कधी?

‘त्या’ उद्योगात महिलांना आरक्षण कधी?

Next

मुंबई : खासगी उद्योगांमधील नोकरीत महिलांना आरक्षण कधी मिळेल, असा थेट सवाल औंध येथील रोहिणी राऊत हिने विचारला, तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी काय करत आहात, असा सवाल बुटीबोरीच्या विशाखा गायकवाडने केला. विद्यार्थ्यांच्या या अनपेक्षित प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितकीच समयोचित उत्तरे दिली.
जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्त राज्यातील ३२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्पाचा शुभारंभ टाटा ट्रस्टच्या अंधेरी येथील व्हॅल्युएबल ग्रुपच्या स्टुडिओमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. शेतीत कौशल्याचा अभाव आहे. शिवाय, वातावरणातील बदलामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत कौशल्याचा विकास करणारे उपक्रम सुरू केले जात असून, त्यांचा वापर करून शेती करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
अमरावतीमध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क सुरू झाले आहे. तेथे आता उद्योग यायला सुरुवात झाली आहे. तेव्हा आता केवळ रोजगारावर अवलंबून न राहता कौशल्य प्राप्त करून घेऊन स्वत:चे छोटे उद्योग सुरू करा, सरकार तुम्हाला मुद्रा योजनेच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य कोणत्याही हमीविना देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आयटीआय झालो की आम्हाला नोकरी देतात, पण लगेच वर्षभरात काढूनही टाकतात. त्यासाठी आम्ही काय करावे, असा सवाल औरंगाबादच्या शिवांजली शिंदे हिने विचारला. त्यावर ‘तुम्ही चांगले काम करा, कोणीही तुम्हाला काढून टाकणार नाही. शिवाय, पहिल्या जॉबकडे संधी म्हणून पाहा,’ असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
खासगी उद्योगात आरक्षण हा वेगळा विषय आहे. मात्र ज्या ज्या उद्योगांनी महिलांना संधी दिली, तेथे महिलांनी खूप चांगले काम केल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा तुमच्या कौशल्यावर विश्वास ठेवा. जग तुमचे स्वागत करेल, असा सल्ला प्रश्नकर्त्या विद्यार्थिनीला मुख्यमंत्र्यांनी दिला.
या वेळी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वाघमारे, टाटा ट्रस्टचे बर्जिस तारापोरवाला, वाधवानी फाउंडेशनचे मोहन, व्हॅल्युएबल ग्रुपचे नरेंद्र हेटे आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: When was the reservation of women in 'that' industry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.