नागपूर टेक्सटाईल पार्कला मंजुरी केव्हा?
By Admin | Updated: December 23, 2014 00:42 IST2014-12-23T00:42:47+5:302014-12-23T00:42:47+5:30
नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या जागेवर टेक्स्टाईल पार्क उभारण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारने या संबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही.

नागपूर टेक्सटाईल पार्कला मंजुरी केव्हा?
विणकर सहकारी सूतगिरणीची जागा पडून : केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही
कमलेश वानखेडे - नागपूर
नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या जागेवर टेक्स्टाईल पार्क उभारण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारने या संबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली. मात्र, नागपूरच्या टेक्स्टाईल पार्कच्या वस्त्रोद्योग विभागाने मंजूर केलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले आहे. नागपूर परिसरातील सुमारे १० हजार विणकरांना रोजगार मिळवून देणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारने विदर्भातून जाता जाता मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा विणकरांकडून व्यक्त केली जात आहे.
३१ जुलै २०१३ रोजी विणकर समाजातर्फे तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संभाशिवा राव यांच्याकडे नागपुरातील विणकरांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणारे काँग्रेसचे डॉ. राजू देवघरे यांनी सूतगिरणीच्या जागेवर इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.
राव यांनी ही मागणी मान्य करीत राज्य शासनाकडून तसा प्रस्ताव आल्यास त्वरित मंजुरी दिली जाईल, असेही स्पष्ट केले होते. यानंतर २२ आॅक्टोबर २०१३ रोजी नागपूर येथे माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, माजी वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान व माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी देत यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर वस्त्रोद्योग विभागाने या संबंधीचा प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केला. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. २८ आॅक्टोबर २०१३ रोजी डॉ. राजू देवघरे यांना तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संभाशिवा राव यांचे पत्र प्राप्त झाले. या पत्रात राज्य सरकारकडून टेक्स्टाईल पार्कचा प्रस्ताव अद्याप प्राप्त झाला नसल्याचे राव यांनी नमूद केले आहे.
४२ एकर जागा उपलब्ध
उमरेड रोडवर नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीची २३ एकर जागा आहे. विदर्भ विणकर को-आॅप. सोसायटीची ८.३३ एकर जागा आहे. विदर्भ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशची १० एकर जागा आहे. ही सर्व ४२ एकर जागा सध्या वस्त्रोद्योग विभागाकडे आहे. या जागेवर संबंधित प्रकल्प साकारला जाणार आहे.
१०० कोटींचा प्रकल्प
टेक्स्टाईल पार्कसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातील ४० कोटी रुपये केंद्र सरकार व ९ कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे. उर्वरित ५१ कोटी रुपये बँक व सभासदांकडून उभारले जाणार आहेत.