"शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:50 IST2024-12-18T13:48:21+5:302024-12-18T13:50:33+5:30
शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आतच तुम्हाला कळेल, असे शिवसेना (ES) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे...

"शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार"
महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये. महाविकास आघाडीने एकमेकांना पाडण्याचे जे काम केले आहे, त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. म्हणून आता ना नाना पटोले त्यांना भेटणार, ना उद्धव ठाकरे त्यांना भेटणार, कुणीही कुणाला भेटणार नाही. वेगवेगळ्या चेहऱ्यांकडे त्यांच्या माना झालेल्या आहेत आणि शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आतच तुम्हाला कळेल, असे शिवसेना (ES) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते.
शरद पवार काय निर्णय घेतील ते सांगता येत नाही, शरद पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात का? असा प्रश्न केला असता, शिरसाट म्हणाले, "शरद पवार आहेत ते. तुम्हाला कुठे दिसतायत? सुप्रियाताई बोलताना दिसत आहेत का? त्यांचे कुणी आणखी प्रवक्ते बोलताना दिसतायत? याचे अर्थ समजून घ्या, जेव्हा ते सर्व शांत असतात तेव्हा समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे." यावर, वादळाचा अर्थ काय? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, "वादळाचा काही अर्थ नसतो, वादळ हे कुणालाही उद्ध्वस्त करत असतं," असेही शिरसाट म्हणाले.
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे भेटीवर काय म्हणाले? -
फडणवीस-ठाकरे भेटीसंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आनंदाची गोष्ट आहे, संस्कृती आहे. निवडणुकीच्या काळात काय बोलले होते, हे आठवलं असे तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की, आपण चुकीचं बोललो. मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी केली नसावी, असे मला वाटते. यावर, काही दिवसांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्यावर बरेच आरोप केले होते? असे विचारले असता शिरसाट म्हणाले, "त्या आरोपांची जाणीव त्यांना झाली ना. आरोप करून काय निष्पन्न झाले? तर आमदार कमी झाले आहेत. २० वर आले. भविष्यात काय होईल याचा तुम्हाला अंदाज येतोच आहे.
...ते सर्व आमदार आमच्या संपर्कात -
यावर, आजून आमदार कमी होतील का? असा प्रश्न केला असता, शिरसाटांनी मोठा गौप्य स्फोट केला, "कमी होतील म्हणजे ते तेथे राहायला हवेत ना? ते सर्व (UBT चे आमदार) आता आमच्या संपर्कात आहेत. पाहू, कधी निर्णय घ्यायचा, तसा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील," असे शिरसाट म्हणाले.