डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 07:47 IST2025-10-03T07:47:10+5:302025-10-03T07:47:34+5:30
स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख यांनी स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणी विरोधातील लढा यांसह प्रत्येक अन्यायाविरोधात लोकांच्या हक्कांसाठी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला.

डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
मधु मोहिते
(सरचिटणीस, युसुफ मेहेरअली सेंटर)
लोकमत न्यूज नेटवर्क
स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख यांनी स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणी विरोधातील लढा यांसह प्रत्येक अन्यायाविरोधात लोकांच्या हक्कांसाठी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. अखेरपर्यंत त्यांनी सत्याग्रह आणि आंदोलनाची मशाल तेवत ठेवली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने आणि त्यावरील खड्ड्यांविरोधात झालेल्या आंदोलनात वयाच्या ८८व्या वर्षी २०१२-२०१३ मध्ये डॉ. पारीख महामार्गावर खुर्ची टाकून बसले होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि सेझ प्रकल्पाविरोधातील मोर्चातही ते सहभागी झाले होते. मुंबईत झालेले सीएए-एनआरसी विरोधातील तरुण पिढीचे आंदोलन असो अथवा अन्य आंदोलने असोत, डॉ. पारीख सक्रिय होते. प्रस्थापितांना जाब विचारणाऱ्या आंदोलनांना ते कायम पाठिंबा देत किंबहुना त्यात सामीलही होत असत.
उमाकांत पुतली या उद्योजक सहकाऱ्याने पनवेल तालुक्यातील तारा गावात डॉ. पारीख यांना नेले. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात आरोग्य सेवा किती विदारक स्थितीत आहे, लोकांना साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांवर उपचार मिळत नाहीत, याचे वास्तव डॉ. पारीख यांना दाखविले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवेतील सहकाऱ्यांना आणि सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तारा येथे ‘संडे क्लिनिक’ संकल्पना सुरू केली. गावकऱ्यांनी गवताने साकारलेल्या मांडवाखाली डॉ. पारीख रुग्णांना तपासत असत. त्यांच्या संडे क्लिनिकमध्ये एका वेळी ३००-४०० रुग्णांना ते तपासत असत. हा उपक्रम १९६२ रोजी सुरू झाला. आता त्याचा वटवृक्ष झाला आहे.
तारा येथे सुरू केलेल्या युसुफ मेहेरअली सेंटरचा या ६३ वर्षांत विस्तार तेल घाणी, साबण बनविणे, मातीची भांडी आणि खेळणी बनविणे, सुतारकाम, डेअरी आणि गांडूळ खत प्रकल्प, हर्बल नर्सरी, सेवाग्राम प्रती बापू कुटी, बा कुटी येथपर्यंत पोहचला. ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराची संधी मिळावी म्हणून त्यांनी हे ग्रामोद्योग उभे केले. तसेच तीन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शंभर-सव्वाशे मुलींचे वसतिगृह उभारले. दुसरे रुग्णालय रत्नागिरीतील गुहागर येथील अंजनवेल येथे सुरू केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या युसुफ मेहेरअली सेंटरचे काम आता देशभरातील १२ ते १३ राज्यांत विस्तारले आहे. त्याच धर्तीवर जम्मू-काश्मीरपासून ते ओडिशा आणि आसामपर्यंत ही केंद्रे सुरू झाली आहेत. तेथील स्थानिकांना ही केंद्रे रोजगार देत आहेत.