घाण पाणी पिणारा मनोरुग्ण जेव्हा उच्च शिक्षित निघतो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:01 PM2017-09-28T23:01:16+5:302017-09-28T23:01:21+5:30

When the dirty water consuming psychiatrist gets highly educated ..! | घाण पाणी पिणारा मनोरुग्ण जेव्हा उच्च शिक्षित निघतो..!

घाण पाणी पिणारा मनोरुग्ण जेव्हा उच्च शिक्षित निघतो..!

Next



दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सहा महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या चाळीस वर्षीय मनोरुग्णाने साताºयातील गल्ली अन् गल्ली धुंडाळली. कधी गटारातील पाणी प्यायचे तर कधी रस्त्यावर टाकलेले शिळे अन्न खाल्ले. मात्र, असा दिनक्रम असलेला मनोरुग्ण जेव्हा उच्च शिक्षित निघाला, तेव्हा भले-भले सामाजिक कार्यकर्तेही अवाक् झाले.
गेल्या सहा महिन्यांपासून एक चाळीस वर्षीय मनोरुग्ण साताºयातून फिरत होता. दाढी वाढलेली, अंगात फाटकी कपडे असा त्याचा पेहराव. रस्त्यावर पडलेले अन्न आणि गटारातील पाणी तो प्यायचा. त्याची अवस्था पाहून अनेकांना अस्वस्थ व्हायचे. एके दिवशी साताºयातील उद्योजक कन्हैय्यालाल पुरोहित पोवई नाका परिसरातून जात असताना त्यांना संबंधित मनोरुग्ण दिसला. याची कल्पना यशोधन मेंटल हेल्थ केअर ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके यांना दिली. बोडके यांनी मनोरुग्णाची भेट घेतल्यानंतर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित मनोरुग्ण आपल्याच धुंदीत तेथून निघून जायचा. या मनोरुग्णावर उपचार करण्यासाठी बोडके यांनी अनेक प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर दहा पोलिसांना घेऊन बोडके त्यांना पकडण्यासाठी गेले. मात्र, म्हणतात ना मनोरुग्णामध्ये हत्तीचं बळ असतं. त्याचा प्रत्यय पोलिसांनाही आला. त्याला पकडण्यासाठी पोलिस गेल्यानंतर त्या मनोरुग्णाच्या अंगात प्रचंड शक्ती यायची. पोलिसांचे हात झिडकावून तो मनोरुग्ण पुढे चालत जायचा.
अशा परिस्थितीतही बोडके यांनी त्याचा पाठलाग करणे काही सोडले नाही. एके दिवशी रात्री गोड बोलून त्या मनोरुग्णाला यशोधन मेंटल केअरमध्ये नेण्यात आलं.
या ठिकाणी संबंधित मनोरुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याचे पाहून अनेकांना हायस वाटलं. हळूहळू सुधारणा होत गेल्यानंतर काही दिवसांनंतर चक्क तो सर्वसामान्यांसारखा बोलू लागला. आपले नाव, गाव हे सारे घडाघडा सांगू लागला.
फलटण तालुक्यातील मलठण येथील श्रीहरी (वय ४०) असे त्याने नाव सांगितले. त्यानंतर ट्रस्टने त्यांच्या घरातल्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांची ओळख पटली. श्रीहरी सपकाळ यांचे एमएस्सीपर्यंत शिक्षण झाले आहे. उच्च शिक्षित असलेल्या श्रीहरी यांनी शेअर मार्केट, विमा एजंटपासून मेडिकल रिप्रेजेंटेटीव्ह म्हणूनही काम केले होते. त्यांना मुलगा प्रणव (वय १२) आणि मुलगी प्रचिती (वय ८) अशी दोन मुले असून, पत्नी फलटण येथील एका कंपनीत काम करते.
अन् आनंदाश्रू वाहू लागले !
‘एमएस्सी’ झाल्यानंतर श्रीहरी सपकाळ यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली. मात्र, शिक्षणाला साजेशी नोकरी मिळावी म्हणून ते नेहमी चिंतेत असायचे. नेहमीच्या ताण तणावामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळू लागली. एके दिवशी अचानक ते घरातून बाहेर पडले. मात्र, ते नेमके कुठे गेले? हे घरातल्यांना समजले नाही. त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत.
यशोधन ट्रस्टने त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता ते चांगले बोलू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. घरात पाऊल टाकल्यानंतर आपल्या मुलांना पाहून त्यांनी लगेच कवेत घेतलं. हे पाहून तेथे उपस्थित असणाºया आप्तस्वकीयांच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहू लागले.

Web Title: When the dirty water consuming psychiatrist gets highly educated ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.