काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:35 IST2025-08-04T12:25:27+5:302025-08-04T12:35:31+5:30
Maharashtra Politics: सत्ताधारी पक्षाच्या 'बोलघेवडे' आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची प्रतिमा मलिन होईल, अशी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन वारंवार केले. तरीही मंत्री काही केल्या ऐकेनात.

काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
Maharashtra Politics: काही मंत्र्यांचे बेशिस्त वर्तन आणि बेछूट विधाने यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. आता झाले ते खूप झाले, यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. खुलासाही न घेता कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांना दिला. परंतु, यानंतरही मंत्री करत असलेल्या विधानांमुळे वाद निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
बेडरुम व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. एका कार्यक्रमात बोलताना निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते? असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचा मास्टर क्लास घेऊनही मंत्री वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत.
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’
मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आणि सत्ताधारी पक्षाच्या 'बोलघेवडे' आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची प्रतिमा मलिन होईल, अशी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन वारंवार केले. तरीही मंत्री काही केल्या ऐकेनात. आ. संजय गायकवाड यांची कॅन्टीनवाल्याशी 'बॉक्सिंग', मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील व्हिडीओ, माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडीओ अशी प्रकरणे उजेडात आली. याउपरही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 'आपले काय चाललेय? पैसा काय आपल्या बापाचा आहे? सरकारचा आहे,' असे वादग्रस्त वक्तव्य करून 'हम नही सुधरेंगे' हाच संदेश दिला का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, यापुढे बेताल वागले, बोलले तर थेट कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. मंत्रिमंडळ बैठकीत अजेंड्यावरील विषयांवर निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पाठवले. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न होते. २० मिनिटे त्यांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, वादग्रस्त विधाने व कृती आता अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ही अखेरची संधी समजा. यापुढे कोणाचा खुलासाही घेणार नाही.