सर्पमित्र कसा असावा? फक्त साप पकडणारा व्यक्ती नाही, तर अत्यंत जबाबदारीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:03 IST2025-07-27T12:03:23+5:302025-07-27T12:03:55+5:30

सर्पमित्र म्हणजे फक्त साप पकडणारा व्यक्ती नव्हे, तर ही एक अत्यंत जबाबदारीची, संवेदनशील व जीवसुरक्षेशी निगडित भूमिका आहे. नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार सर्पमित्रांना दहा लाखांचा विमा आणि फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळाला आहे.  

what should a snake catcher be like | सर्पमित्र कसा असावा? फक्त साप पकडणारा व्यक्ती नाही, तर अत्यंत जबाबदारीची भूमिका

सर्पमित्र कसा असावा? फक्त साप पकडणारा व्यक्ती नाही, तर अत्यंत जबाबदारीची भूमिका

डाॅ. हिंमतराव बावसकर, पद्मश्री, चिकित्सक, शास्त्रज्ञ 

एक परिपूर्ण सर्पमित्र मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि कमीत कमी पदवीधर असावा. त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याआधी कुटुंबाची स्पष्ट परवानगी घेतलेली असावी. पैसे कमावणे, प्रसिद्धी मिळवणे हे हेतू नसून सामाजिक बांधिलकी हीच खरी प्रेरणा असली पाहिजे.

सर्पमित्राकडे स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे, जेणेकरून एखादा कॉल आल्यावर तो वेळेवर पोहोचू शकेल. पण हे करत असताना त्याने घाई करू नये. सर्प दिसलेल्या ठिकाणाचा पत्ता, तेथे पोहाेचण्याचा मार्ग यांची माहिती घेऊन नियोजितपणे पोहोचावे. सर्पमित्राबरोबर एक सुशिक्षित सहकारी असणे गरजेचे आहे. तसेच त्या दोघांनाही विषारी आणि बिनविषारी सर्पांची अचूक ओळख असणे अत्यावश्यक आहे. एखादा सर्प पकडल्यानंतर प्रसिद्धीसाठी तो उगाच लोकांसमोर दाखवणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे टाळावे. 

या वस्तू असणे गरजेचे

लांब हुक असलेली काठी, रबर टॉंग्स, सुरक्षित सर्प पिशवी, जाड रबरचे ग्लोज, पारदर्शक प्लॅस्टिक नळकांडे, फुल्लपँट, उंच रबर बूट, टॉर्च या गोष्टी सर्पमित्राजवळ असणे गरजेचे आहे. तसेच संवाद साधण्यासाठी सर्पमित्र आणि त्याच्या सहकाऱ्याकडे फोन असणे गरजेचे आहे. सर्पदंश किंवा एखादा अपघात घडल्यास त्वरित कृती करता यावी यासाठी फर्स्टएड किट आणि फोनमध्ये डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्सचे क्रमांक असणे आवश्यक आहेत. 

परवाना असणे आवश्यक

सर्पमित्राने प्रशिक्षित आणि परवाना प्राप्त असणे गरजेचे आहे. त्याचा लायसन्स दरवर्षी नूतनीकरण करणे अनिवार्य आहे. सर्पदंश झाला किंवा साप निसटला तर ते हे अपयश मानून पुन्हा प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. चुकीच्या आत्मविश्वासातून केलेले धाडस जिवावर बेतू शकते. तसेच सर्पमित्राने सर्व प्रकारच्या सापांचे फोटो जवळ बाळगणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्यक्षदर्शींना तो साप कोणता आहे, हे सांगणे सोपे जाईल.

सर्पदंश झाल्यास... 

साप पकडत असताना सर्पदंश झाल्यास तो विषारी किंवा बिनविषारी असू द्या, तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्याविना स्वतः कोणतेही उपचार करू नयेत. तसेच सर्पमित्राला कोणतीही ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास नसावा. 

Web Title: what should a snake catcher be like

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.