प्रकाश सुर्वेंनी जे विधान केलं त्यात चुकीचं काय?; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:58 IST2025-11-04T15:57:51+5:302025-11-04T15:58:45+5:30
प्रकाश सुर्वे यांच्या विधानाचा विपर्यास करून कुणी उगीच राजकारण करू नये असंही योगेश कदम यांनी विरोधकांनी म्हटलं.

प्रकाश सुर्वेंनी जे विधान केलं त्यात चुकीचं काय?; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली पाठराखण
मुंबई - मराठी माझी आई आणि उत्तर भारत मावशी आहे, आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त विधान शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले होते. या विधानावरून सर्वच स्तरात संताप व्यक्त होत असताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सुर्वे यांच्या विधानावरून पाठराखण करत विरोधकांवरच आरोप केले आहेत.
योगेश कदम म्हणाले की, निवडणुकीच्या काळात विरोधकांनी नेहमीच मराठी भाषेला घेऊन राजकारण केले आहे. मराठी माझी माय आहे त्यात चुकीचे काय? प्रकाश सुर्वे हे स्वत: मराठी आहेत. कोकणातील आहेत. गेली अनेक वर्ष मराठीचा सन्मान राखण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांना साथ देतायेत. शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वक्तव्य फिरवणे आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करणे हे विरोधकांचे काम आहे. या विषयाला वेगळी कलाटणी देण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रकाश सुर्वे यांचं म्हणणं स्पष्ट होते. मराठी ही त्यांची आई आहे आणि मराठीला नेहमीच आईचा दर्जा दिलेला आहे. ते चुकीचे नाही. महाराष्ट्रासोबत भारतात अनेक ठिकाणी हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी भाषिक मुंबई आणि महाराष्ट्रातही आहे. त्यामुळे हिंदी भाषा बोलल्याने मराठीचा अपमान होतो असा समज करणे चुकीचा आहे. मराठी आपल्यासाठी प्राधान्याची भाषा आहे. मराठी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. मराठीशिवाय इतर भाषा मोठी होणार नाही याची खात्री आम्हीही बाळगली पाहिजे. त्याची चिंता आम्हाला आहे. प्रकाश सुर्वे यांच्या विधानाचा विपर्यास करून कुणी उगीच राजकारण करू नये असंही योगेश कदम यांनी विरोधकांनी म्हटलं.
काय म्हणाले होते प्रकाश सुर्वे?
“मराठी माझी आई आहे आणि हिंदी माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे; कारण आईपेक्षा मावशी जास्त प्रेम करते,” असे वादग्रस्त वक्तव्य सुर्वे यांनी सोमवारी उत्तर भारतीयांच्या एका कार्यक्रमात केले. ‘उत्तर भारतीयांनी माझ्यावर आईपेक्षा जास्त प्रेम केले, असेच प्रेम माझ्या अन्य सहकाऱ्यांवरही करा असं आवाहन सुर्वे यांनी उत्तर भारतीयांना केले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले.