पालिका निवडणुकीपूर्वी भाऊ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती केल्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीविरोधात कठोर टीका केली होती. मात्र या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज ठाकरे यांनी पुढील राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे जाहीर केले होते. एकीकडे सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीमागचं नेमकं कारण काय होतं, याचा उलगडा खुद्द राज ठाकरे यांनीच केला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे आता पूर्वीसारखं निकोप राजकारण राहिलेलं नाही. कुठलेही नेते एकमेकांना भेटले की त्यामागून काही तरी राजकारण शोधून काढलं जातं. एकतर आता तीन वर्षांनंतर निवडणुका आहेत. त्यामुळे सध्या तर तशी परिस्थिती नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता निवडणुका संपलेल्या आहेत. एकनाथ शिंदे हे सत्तेवर आहेत. त्यामुळे आम्हाला काही सल्ले द्यायचे असतील, काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील. तर त्यासाठी भेट घ्यायला नको का? की त्यामधून काही तरी शोधलंच पाहिजे, राजकारण शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन. आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये प्रत्येक शहराचे प्रश्न आहेत. राज्याचे प्रश्न आहेत. आम्हाला जे प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते सांगणं गरजेचं नाही का? परवा तुम्ही तिथे उपस्थित असता तर मी कशासाठी भेटलो हे तेव्हाच सांगून टाकलं असतं, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.