- अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई
मा. राहुल नार्वेकरजी, नमस्कार गेला आठवडा विधानसभा गाजवणाऱ्या आ. संजय गायकवाड यांच्या कृत्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खरे तर त्यांच्यावर अन्यायच झाला, असे आपल्याला वाटत नाही का? दिवसभर सभागृहात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी यात सगळे लोकप्रतिनिधी व्यस्त असतात. रात्री दमून भागून आमदार निवासात आल्यावर जेवणही चांगले मिळत नसेल तर त्यांनी काय करावे? मारहाण करणारे ते पहिले आमदार नाहीत.
२०१३ मध्ये क्षितिज ठाकूर यांनी पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. त्याआधी मनसेमध्ये असताना राम कदम यांनी शपथ घेण्यावरून अबू आझमी यांचा सभागृहातच कार्यक्रम केला होता. विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर मासे फेकले होते. मात्र, ते आपल्याला दिसलेच नाहीत, असे पुढे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (बहुतेक ते अधिकारी मनोहर जोशी पंथाचे असावेत) सरकारी कर्मचाऱ्यांविषयी सगळ्यात जास्त प्रेम नितेश राणे यांना की बच्चू कडू यांना यावर दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची समिती नेमा. तेव्हा केवळ आमदाराने मारहाण केली म्हणून एकट्याची चौकशी न करता असे मुलखावेगळे काम करणाऱ्या आमदार, अधिकाऱ्यांना खरे तर विधिमंडळातर्फे सन्मानित केले पाहिजे. ज्या ज्या आमदारांनी आत्तापर्यंत अधिकाऱ्यांवर हात उगारला, त्या सगळ्यांचा सत्कार करता येईल, शिवाय ज्या अधिकाऱ्यांनी सगळे नियम गावाच्या बाहेर, धाब्यावर नेऊन ठेवले असतील, त्यांचाही ढाबारत्न पुरस्काराने सन्मान केला तर..? परवाची घटना पेपरमध्ये वाचल्यापासून आम्हाला रिकामा वेळ भरपूर होता. बसल्या बसल्या काही कल्पना सुचल्या आहेत. त्यावर अंमल झाला तर भविष्यातले आदर्श आमदार, असे असतात हे सांगता येईल.
आमदार निवासाचे कॅन्टीन, सरकारच्या विविध विभागांतील कामांचे टेंडर वर्षांनुवर्षे स्वतःलाच मिळवणाऱ्या ठेकेदारांचे व त्यांच्या यशात सहभागी असणाऱ्या अधिकारी, मंत्रिमहोदयांना जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे. ज्या एफडीए अधिकाऱ्यांनी आमदार निवासच नव्हे, तर महाराष्ट्रातील कुठल्याही हॉटेलची, कधीही, कसलीही तपासणी केलेली नाही, अशा अधिकाऱ्यांना कार्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. आमदारांना कशा पद्धतीने जेवण दिले ते फोटोमधून दिसून आले. प्लास्टिकबंदी असतानाही प्लास्टिकच्या पिशवीत डाळ भात देणाऱ्या, प्लास्टिकबंदी राज्यात लागू न करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्लास्टिक शिरोमणी पुरस्कार द्यायला हरकत नाही.
विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत असताना नॅपकिनवाले आमदार हळूच कोणाकडून तरी एका हातात काहीतरी घेतात. दुसऱ्या हाताने ते चोळून हलकेच स्वतःच्या ओठाखाली ठेवतात... असा व्हिडीओ आम्हाला घरबसल्या पाहायला मिळाला. (बहुतेक तंबाखू अशा पद्धतीने खाल्ली जात असावी.) आमच्या नातवाने, ते काका जे खात आहेत ते मला पाहिजे, असा आग्रह धरला होता. ते नेमके काय खात होते, हे कळाले तर आम्ही आमच्या नातवाला ते घेऊन द्यावे का..? सभागृहात तंबाखूसदृश्य पदार्थ खाता येत असेल तर तो कुठेही खाता येईल ना... (सभागृहात मोबाइलवर पॉर्न फिल्म बघणारे आपल्या विधानसभेत नाहीत. त्या मानाने आपण बरेच मागे पडलो आहोत.)
महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना तो राजरोस विकू देणाऱ्या एफडीए अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्याच गुटख्याच्या माळा घालून सत्कार केला पाहिजे. म्हणजे फुलांवर होणारा खर्चही वाचेल. आमदार महोदयांना चांगले जेवण मिळाले नाही, म्हणून त्यांनी त्याचा राग जेवण आणून देणाऱ्या वेटरवर काढला. ‘चूक कोणाची, मार कोणाला’ या शीर्षकांतर्गत त्या वेटरचाही चांगले कपडे देऊन सत्कार करा. त्याचवेळी आमदार आणि मंत्र्यांना ठोक भावात नाईट ड्रेस घेऊन द्या. एवढा प्रगत व श्रीमंत महाराष्ट्र, पण त्या राज्यातले लोकप्रतिनिधी बनियान, टॉवेल, लुंगी अशा वेशात बसतात, हे बरोबर नाही. नाईट ड्रेस घेण्यासाठी एखादे मोठे टेंडर काढा. शेवटी ते विधिमंडळाची प्रतिमा उंचावत असतात. संजय शिरसाठ एवढे मोठे मंत्री. मात्र तेही बनियनवर बसून सिगरेट ओढताना दिसले. बनियन, लुंगीवर आमचे नेते पाहून आम्हाला किती वाईट वाटले. तुमचा रागही आला. तुम्ही विधिमंडळाचे सर्वेसर्वा. लोकप्रतिनिधींची अशी अवस्था योग्य नाही. अधिवेशन संपायच्या आत सगळ्यांना चांगले नाइट ड्रेस घेऊन द्या. (सिगरेट ओढल्याने कॅन्सर होत नाही का? तसे असेल तर तेही तुम्ही जाहीर करा.)शिवाय नोटा ठेवायला जागा नसल्यामुळे अनेक नेत्यांना नोटांची बंडले बॅगमध्ये ठेवावी लागतात. बॅग चुकून उघडी राहिली की, त्याचे कोणीतरी शूटिंग करते. आपल्याकडे भोंग्यांना बंदी असली, तरी सकाळी एक भोंगा नियमितपणे वाजतो, असे आ. अमीन पटेल सांगत होते. त्यामुळे त्या भोंग्यावरून हे जाहीर प्रसारण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करते. तेव्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना एक चांगले लॉकरही घेऊन द्या. ज्यांच्याजवळ नोटा असतील ते नोटा ठेवतील. ज्यांच्याकडे नसतील त्यांना नोटा गोळा करण्याची इच्छा निर्माण होईल. त्यातून एक सकारात्मक वातावरण तयार होईल. अध्यक्ष म्हणून असे वातावरण तयार करण्याची तुमची जबाबदारी नाही का..? आपल्या उत्तराची अपेक्षा नाही. - आपलाच, बाबूराव