आमचं ठरलं ! पण ठरलं काय ? हे गुपीत ठेवल्याने झाली भाजपची अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 12:45 IST2019-11-18T12:44:46+5:302019-11-18T12:45:19+5:30
काय ठरलं, हे गुपीत ठेवल्यानेच भाजपची मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

आमचं ठरलं ! पण ठरलं काय ? हे गुपीत ठेवल्याने झाली भाजपची अडचण
मुंबई - विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या साथीत लढलेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील वितुष्ट वाढलं आहे. त्यामुळे सरकार स्थापनेला विलंब होत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेच्या हालचालींना सुरुवात केली आहे. युतीत ठरलेलं गुपीत वेळीच उघड न केल्यानेच अशी स्थिती निर्माण झालं आहे.
युती करतेवेळी भाजप आणि शिवसेनेत आवश्यक ते सर्वकाही ठरल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्येकवेळी शिवसेना नेते संजय राऊत, भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरल्याचं सांगत होते. मात्र आता सत्तेचा 50-50 टक्केचा फॉर्म्युला भाजपने अमान्य केला आहे.
विधानसभा निवडणुकीत युती असताना देखील भाजप आणि शिवसेनेकडून अनेक बंडखोर लढले होते. मात्र एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने दोघांमध्ये बिनसल आहे. युती करताना सत्तेचं समसमान वाटप ठरलं होतं, असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. असा फॉर्म्युला सांगतानाचा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तर भाजपने समसमान वाटप ठरलंच नव्हतं असा दावा केला आहे.
दरम्यान दोन्ही पक्षातील नेत्यांकडून निवडणुकीच्या निकालापूर्वीपर्यंत सगळ व्यवस्थीत ठरल्याचं सांगण्यात येत होते. परंतु, आता ठरलेलं दोन्ही पक्षांकडून मान्य होत नाही. काय ठरलं, हे गुपीत ठेवल्यानेच भाजपची मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.