घरातील नेतेगिरी! खासदार वर्षा गायकवाड यांना वडिलांनी कुठला कानमंत्र दिला होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 07:29 IST2025-02-09T07:29:02+5:302025-02-09T07:29:25+5:30
बाबा जेव्हा धारावीमधून लोकसभेला उभे होते तेव्हा लोकांना वाटत नव्हते की ते निवडून येतील. त्यावेळी कुणाचाही फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता.

घरातील नेतेगिरी! खासदार वर्षा गायकवाड यांना वडिलांनी कुठला कानमंत्र दिला होता?
गाणे गुणगुणणे हेच माझ्यासाठी मेडिटेशन
मला गाण्याची आवड आहे, पण गाता येत नाही. काही लोक आवाज चांगला नसतानाही का गातात ते कळत नाही. आपल्या गाण्याबद्दल तसे कोणी बोलायला नको, हे माहीत असल्याने मी गात नाही. मात्र मला गाणी ऐकायला खूप आवडते. जुन्या काळातील बरीचशी गाणी माझी पाठ आहेत. ती गाणी गुणगुणायला आवडते. गाणी गुणगुणण्यामुळे मानसिक शांतता मिळते. मला वाटते गाण्यांच्या माध्यमातून मी अनेकदा मेडिटेशन करते.
रडायचं असेल तर राजकारणात येऊ नको!
बाबा निवडून आल्यानंतर मी नगरसेवक पदासाठी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र मला पक्षाने तिकीट दिले नाही. त्या वेळेस मला खूप वाईट वाटले आणि मी सतत रडत होते. माझ्या बाबांनी मला सांगितले, तुला योग्यवेळी पक्ष तिकीट देईल. परंतु जर तुला रडत बसायचे असेल आणि लढायचे नसेल तर तू राजकारणात येऊ नकोस. त्यानंतर मी कधीही रडले नाही आणि आजपर्यंत लढते आहे.
खवय्येगिरीची भरपूर आवड
मला चांगलेचुंगले पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. मी स्वतः काही पदार्थ उत्तम बनवते. मला चायनीज, इटालियन पदार्थांसोबतच महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात. मला पुरणपोळी आणि साबुदाणा खिचडी आवडते. मुंबईचा स्पेशल वडापाव आवडतो.
धरमशाला आवडते ठिकाण
लाँग ड्राइव्हला जायला नेहमीच आवडते. महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि तारकर्ली समुद्रकिनारा ही माझी आवडती ठिकाणे आहेत. सातारा जिल्ह्यातील माझे कोंडवे गावसुद्धा माझे खूप आवडते ठिकाण आहे. मात्र, धरमशाला हे ठिकाण माझे खूप आवडते असून, मी वारंवार तिथे जात असते.
ठरवून राजकारणात आले
मी राजकारणात अगदी ठरवून आले. माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी वक्तृत्व आणि अन्य काही स्पर्धांमध्ये भाग घेत नसले तरी मी विविध उपक्रमांमध्ये पुढे असायचे. माझे बाबा एकनाथ गायकवाड हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच गर्दी असायची. मी त्यांच्याजवळ बसून त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांना पाहत असायची. मला माणसांनी भरलेले घर नेहमीच आवडते. मला स्वतःला लोकांमध्ये राहायला आवडते. त्यामुळे मी राजकारणात स्वतःहून ठरवून आले. बाबा जेव्हा धारावीमधून लोकसभेला उभे होते तेव्हा लोकांना वाटत नव्हते की ते निवडून येतील. त्यावेळी कुणाचाही फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. नेते प्रचारासाठी येत नव्हते. अशा वेळेस मी, माझी बहीण आणि वीरेंद्र बक्षी तसेच सावंत या दोन-तीन कार्यकर्त्यांनी सातत्याने बाबांसोबत काम केले.
प्रेमविवाहानंतर पतीची राजकारणातही साथ
माझ्या पतीचे नाव राजू गोडसे आहे. आमचा प्रेमविवाह आहे. राजू यांनी आय.सी.डब्ल्यू.ए. मधून एमबीए केले. काहीकाळ त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केले. मात्र आता ते पूर्णवेळ माझ्यासोबत धारावी मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी काम करीत आहेत. त्यांनी नेहमीच राजकारणात आणि घरात माझी साथ दिली आहे.