...पण रस्ता सुरक्षेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:52 AM2020-05-24T00:52:49+5:302020-05-24T00:53:19+5:30

जगभरात रस्ते अपघातांमुळे १३ लाख ५० हजार लोक मरण पावले आहेत.

... but what about road safety? | ...पण रस्ता सुरक्षेचे काय?

...पण रस्ता सुरक्षेचे काय?

Next

- संदीप गायकवाड

जगभरात रस्ते अपघातांमुळे १३ लाख ५० हजार लोक मरण पावले आहेत. जगातील रस्त्यांवर दररोज जवळजवळ ३७०० लोक मरत आहेत. दरवर्षी लाखो लोक जखमी होतात किंवा त्यांना पंगुत्व येते व त्याचा दीर्घकाळ जीवन जगणाऱ्यांना त्रास होतो. तसेच रस्ते अपघात हे ५-२९ या वयोगटांतील लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे.

भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांमुळे १.५ लाख लोक मरण पावतात व असंख्य लोक जखमी होतात. सरासरी दररोज ४०० जण रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडतात. गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या गणनेपलीकडे आहे. रस्ते अपघातांमुळे भारताला तीन टक्के सरासरी राष्ट्रीय उत्पन्नात तोटा होतो.

कोरोना हा एक गंभीर आजार असला, तरी तो बरा होतो. या लेखात कोरोना आजार व रस्ते अपघात समस्या यामध्ये कोणत्याही प्रकारे तुलना करण्याचा हेतू नाही. मुळात, या दोन्ही भिन्न प्रकारच्या समस्या आहेत. त्या दोन्हींची कारणे, संदर्भ, उपाययोजना वेगळ्या आहेत. परंतु, मला वाटते की, दोन्ही बाबी या मानवी जीवनाशी निगडित आहेत, किंबहुना त्या मानवजातीचे भवितव्य आणि परिणामी होणाºया अगाध नुकसानीविषयी प्रभावी ठरणाºया आहेत.

कोरोनाचा भारतात प्रसार होण्याआधीपासून भारत सरकार ठाम उपाययोजनांची तयारी करताना दिसले. भारत कशाप्रकारे या आजाराशी सामना करण्यास सुसज्ज व सामर्थ्यशाली आहे, याची सतत यादी सांगत आहे. केवळ सरकारच नव्हे तर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर विविध उपाययोजना आखल्या आहेत.

देशात कोरोनामुळे पहिला रुग्ण बाधित झाल्यापासून प्रसारमाध्यमांनी या आजाराविषयी जनजागृती करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही पातळीवर समाधानकारक उपाययोजना आखल्या जात नाही. याउलट, रस्ते रुंद करणे, मोठे उड्डाणपूल बांधणे, धोकादायक महामार्गांची निर्मिती आणि दिशाहीन जनजागृती, यावर भर दिला जातो. काही काळातच कोरोनाविषयी भरपूर संशोधने केली जात आहेत, परंतु रस्ते अपघातांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्याविषयी कोणत्याही हालचाली केल्या जात नाही.

सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, हात वारंवार साबणाने धुणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रूमाल धरणे, श्वसनाचे विकार असणाºया व्यक्तीशी संपर्क न ठेवणे... यासारखी खबरदारी घेतल्यास कोरोनाचा धोका टाळता येतो. त्याचप्रमाणे वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, वाहतुकीचे नियम पाळणे इ. गोष्टी ज्या अपघातांसाठी कारणीभूत आहेत, त्या अंगीकारल्यास अपघात टाळता येतो आणि जरी अपघात झाला, तरी जीव वाचला जाऊ शकतो. यासारख्या मूलभूत गोष्टींची

शासन कधी अंमलबजावणी करेल ?

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे, तांत्रिक बाबी, नियमांचे पालन केल्यास रस्ते अपघातांतून होणाºया मृत्यूंची व जखमींची संख्या निश्चितच कमी करू शकतो. योग्य खबरदारी घेतल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे अथवा कमी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे रस्ते सुरक्षेच्या बाबतीतदेखील हे तत्त्व लागू पडते.

कोरोनाला ‘नोवल’ विषाणू संबोधले जाते, म्हणजेच हा विषाणू यापूर्वी मानवजातीला माहीत नव्हता. हा विषाणू कशाप्रकारे मानवी जीवनावर परिणाम करतो, यावर लस कोणती आहे, याविषयी सर्वजण अंधारात आहेत. अचानक आलेल्या या आजाराने आपण गांगरून व गोंधळून गेलो नाही, तर याला समर्थपणे आणि यशस्वीपणे प्रतिकार करत आहोत आणि बºयाच प्रमाणात यशदेखील मिळवले आहे. परंतु, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने असे चित्र पाहायला मिळत नाही.

रस्ते अपघात ही समस्या मागील कित्येक दशके सतावत आहे आणि संपूर्ण जग याचे परिणाम भोगत आहे. भारतात मागील दशकात (२००८-२०१८), १४ लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. पण, आपले सरकार योग्य ती खबरदारी, उपाययोजनांची का अंमलबजावणी करू शकत नाही? खरे पाहता, कोरोनामुळे दर १०० बाधित लोकांपैकी तीन लोक मरण पावतात. रस्ते अपघातांत महाराष्ट्रात दर १०० अपघातांमागे ३७ टक्के लोक मरण पावतात. ही तीव्रता आपल्याला केव्हा कळणार ?

कोरोना आजारावर अजूनतरी कोणतेही औषध नाही. तज्ज्ञांच्या मते, कोरोनावर प्रभावी ठरणारी लस येण्यासाठी अजून एक ते दीड वर्षे कालावधी लागेल. कदाचित, आपण लवकरच यावर मात करू, असा मला ठाम विश्वास आहे. पण, आपण रस्त्यावरील लढाई केव्हा जिंकणार?

रस्ते अपघातांविषयी आपण जेव्हा कधी चर्चा करतो, तेव्हा काही ठरावीकउत्तरे ऐकायला मिळतात... ‘लोकांना जीवाची पर्वा नाही, शिस्तीने गाड्या चालवत नाही, नियम पाळत नाही, लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.’ पण ही सर्व कारणे कोरोना आजाराने फोल ठरवली आहेत. लोकांना आपल्या, आपल्या प्रिय व्यक्तींच्या, शेजाºयांच्या आणि समाजाच्या जीवाची काळजी आहे.

कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून लोक गेले दिवस शिस्तीने घरात बसू शकतात. दूध, भाजी, किराणा खरेदी करतेवेळी एक मीटर अंतर ठेवून काही वेळ उभे राहू शकतात. लोकांना मास्क वापरण्यासाठी, हात साबणाने धुण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता नाही. मग, हे शहाणपण आपल्याला रस्ते सुरक्षेच्या बाबतीत केव्हा येईल ? रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे, तांत्रिक बाबी, नियमांचे पालन केल्यास रस्ते अपघातांतून होणाºया मृत्यूंची व जखमींची संख्या निश्चितच कमी करू शकतो.

Web Title: ... but what about road safety?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.