"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:46 IST2025-07-24T14:45:16+5:302025-07-24T14:46:21+5:30

कृषिमंत्री असो वा कुणीही मंत्री असो लोकांसमोर बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे. स्वत:ला काही बंधने पाळून घेणार की नाही याचे भान ठेवले पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं.

We will take the next decision after discussing with Manikrao Kokate, Ajit Pawar's stand on the resignation of the Agriculture Minister | "इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा

"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा

मुंबई - विधानसभेच्या सभागृहात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्याबाबत हा परिसर सभापती राम शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अख्यारित आहे.  ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. माझी सोमवारी किंवा मंगळवारी कृषिमंत्री कोकाटेंसोबत भेट होईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी कोकाटे यांचा खुलासा ऐकला, मी खेळत नव्हतो असं ते बोलले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर आम्ही प्रत्येक मंत्र्‍यांशी चर्चा केली होती. प्रत्येकाने भान ठेवून वागले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. कोकाटेंबाबत मागेही असेच काही घडले तेव्हा त्यांनी मी समज दिली होती. दुसऱ्यांदा घडले तेव्हाही समज दिली. त्यावेळी इजा, बिजा झाला तिजाची वेळ आणू नका असं सांगितले होते. आता सोमवारी किंवा मंगळवारी आमची भेट होईल. समोरासमोर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढचा काय असेल तो निर्णय घेऊ असं सांगत अजित पवारांनी कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यावर उत्तर दिले. 

तसेच कृषिमंत्री असो वा कुणीही मंत्री असो लोकांसमोर बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे. स्वत:ला काही बंधने पाळून घेणार की नाही याचे भान ठेवले पाहिजे. सरकारमधील मंत्र्‍यांच्या वादावर मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेऊ. महायुतीत काम करताना कुठल्याही नेत्याकडून, मंत्री-राज्यमंत्र्‍यांकडून सरकारला कमीपणा येईल अशी वागणूक होता कामा नये. हे तीन पक्षाचे सरकार आहे. कुणाकडून काही वाद झाले तर त्या त्या पक्षाची नैतिक जबाबदारी असते आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेऊ शकतात असंही अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, लातूरमधील मारहाणीच्या घटनेबाबत मला कळले तेव्हा मी ताबडतोब त्यावर ट्विट करून माझी भूमिका स्पष्ट केली. संबंधित पदाधिकाऱ्याला राजीनामा देण्याचे आदेश दिले. यशवंतराव चव्हाणांनी जी शिकवण आपल्याला दिली त्याला गालबोट लागता कामा नये. त्या दृष्टीने मी राजीनामा देण्याची सूचना केली आणि त्याने राजीनामा दिला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. 

"हा महाराष्ट्र, इथं आधी मराठी मग बाकी..."

सगळ्यांनी आपापलं भान ठेवले पाहिजे. प्रत्येक राज्यात त्यांच्या मातृभाषा महत्त्वाची असते. भारतात त्या त्या राज्याची मातृभाषा वगळली तर दुसरी भाषा हिंदी चालते. तिसरी भाषा इंग्रजी चालते. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबाबत आदर असला पाहिजे. ती टिकली पाहिजे. परंतु इथं राहणाऱ्यांनी पण मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करावा. मी बोलणारच नाही अशी भाषा वापरू नका. जिथे तुम्ही राहता तिथली भाषा, माणसांचा विचार करायला हवा. आम्ही मराठीचा आदर करू, मराठी शिकू असं बोलले तर समस्या येणार नाही. हा महाराष्ट्र आहे. इथं पहिले मराठी चालते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आधी मराठी मग बाकी अशी भूमिका अजित पवारांनी मराठी-हिंदी वादावर घेतली.  

Web Title: We will take the next decision after discussing with Manikrao Kokate, Ajit Pawar's stand on the resignation of the Agriculture Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.