आम्ही दूध उत्पादकांच्या पाठीशी, न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 19:09 IST2020-08-11T19:09:02+5:302020-08-11T19:09:19+5:30
भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठीशी असून, त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्ही दूध उत्पादकांच्या पाठीशी, न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही- देवेंद्र फडणवीस
मुंबई- राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांच्या समस्या दिवसागणिक वाढतच आहेत, दुसरीकडे राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठीशी असून, त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
असाच प्रश्न आमच्या सरकारच्या काळात आला, तेव्हा दूधसंघांना प्रतिलिटर दूधखरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते. दूध उत्पादकांचा लढा आता निर्णायक टप्प्यात नेला जाईल. पक्षातर्फे रितसर आंदोलनाची घोषणा केली जाईलच, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
या कठीण प्रसंगी दूध उत्पादकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. ही लढाई संपेस्तोवर भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमचे इतर सहकारी महादेवराव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानीताई फरांदे आणि इतरही नेते प्रामुख्याने उपस्थित होते.