संकटप्रसंगी मतभेद सोडून पंतप्रधानांसोबत उभे राहू, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:10 IST2025-05-18T13:10:21+5:302025-05-18T13:10:50+5:30
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे आमदार, खासदार, उपनेते, जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, उपनेते यांना वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा, अडचणींचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले.

संकटप्रसंगी मतभेद सोडून पंतप्रधानांसोबत उभे राहू, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
मुंबई : देशात एक वेळ भाजप राहणार नाही; पण काश्मीर काल आपलेच होते, आजही आहे आणि उद्याही राहील. आम्ही देशाच्या विरोधात नाही तर सरकारविरोधात आहोत. पंतप्रधान मोदींसोबत वैचारिक मतभेद आहेत, असतीलही; पण देशावर संकट येईल त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले.
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे आमदार, खासदार, उपनेते, जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, उपनेते यांना वेगवेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा, अडचणींचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले.
ओव्हरलोड भाजपला बुडण्याची भीती
‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे ठीक आहे; पण निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या प्रचारात उतरू नये. अन्य पक्ष फोडून भाजपचे जहाज ओव्हरलोड झाल्यामुळे ते बुडण्याची भीती वाटत आहे. अमित शहा हे अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली.
लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा
भारत- पाक युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातील अन्य प्रश्न बाजूला राहिले आहेत. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. लाडकी बहीण, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला अत्याचाराच्या घटना, पाणीटंचाईसारखे जनजीवनाशी निगडित प्रश्नांवर काम करावे, असा सूचना पक्षप्रमुखांनी केल्याची माहिती खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली.