Devendra Fadnavis Speech: राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देतानाच देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मिम्सचा उल्लेख करत मिश्कील भाष्य केले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय लवकर होत नव्हता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनाही मुख्यमंत्री करा आणि प्रत्येकाला 8 तासांची शिफ्ट द्या, अशा आशयाचे एक मिम्स व्हायरल झाले होते. त्याचा उल्लेख आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणा दरम्यान केला.
निकालाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राज्याच्या जनतेने चांगला जनादेश दिला आहे. जनादेश मिळाल्यावर आम्ही खरोखर आनंदीच होतो. पण, आता तो आनंद ओसरल्यानंतर जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे. कारण जेव्हा एवढा मोठा जनादेश मिळतो. जनादेश जबाबदाऱ्या घेऊन येतो. लोकांच्या अपेक्षा घेऊन येतो. त्या अपेक्षा पूर्ण करणे, ही आमची जबाबदारी आहे. म्हणून जी आमची क्षमता आहे, त्या क्षमतेचा पूर्ण वापर करू", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, "अलिकडच्या काळात अनेक मिम्स चालतात. आमचं सरकार ज्यावेळी तयार होत होतं. त्यावेळी एक व्हिडीओ आला होता. त्या व्हिडीओत ती बाई असं म्हणते की काही प्रश्न नाही. तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि ८-८ तासांची शिफ्ट देऊन टाका. तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली आहे."
कोणाला कोणती शिफ्ट, फडणवीसांनी सांगितल्या वेळा
फडणवीस म्हणाले, "सकाळी ८ वाजेपासून ४ वाजेपर्यंत दादा (अजित पवार). कारण ते सहा वाजता तयार असतात. ४ वाजेपासून १२ वाजेपर्यंत मी... १२ ते ८ कोण राहू शकतं (एकनाथ शिंदे)", असे म्हणत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे बघितलं आणि हसले. त्यानंतर सभागृहातील सर्वच उपस्थित सदस्यांना हसू अनावर झाले.