पाण्याचा केमिकल लोचा !
By Admin | Updated: October 9, 2014 01:06 IST2014-10-09T01:06:43+5:302014-10-09T01:06:43+5:30
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत नागपूरपासून केवळ २५ कि़मी. अंतरावर असून आर्थिक उपराजधानी अशी ओळख आहे. येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शरीराला घातक असलेले रसायन

पाण्याचा केमिकल लोचा !
बुटीबोरीचे पाणी पिण्यास अयोग्य
विहंग सालगट - नागपूर
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत नागपूरपासून केवळ २५ कि़मी. अंतरावर असून आर्थिक उपराजधानी अशी ओळख आहे. येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शरीराला घातक असलेले रसायन व कठोर धातूमिश्रित पाणी पित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
हे कटू सत्य जाणून घेण्यासाठी लोकमत चमू बुटीबोरी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचली. येथील लोकांनी सांगितलेली माहिती गंभीर आहे. थेट वेणा नदीत पाईपलाईन टाकून या क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदीत औद्योगिक क्षेत्रातील घाण आणि रसायनयुक्त पाणी सोडले जाते. एकच जलस्रोत असल्याने पाईपलाईनद्वारे आलेले पाणी पिण्याशिवाय गावकऱ्यांसमोर पर्याय नाही. या पाण्याला फिल्टर का करण्यात येत नाही, ही बाब ग्रामपंचायतकडून जाणून घेण्याचा प्रयत्न चमूने केला. पण नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी सांगितले की, फिल्ट्रेशनचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित आहे. दोन वर्षांआधी काम सुरू झाले, पण ते कासवगतीने सुरू आहे. या कामावर ७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
महाराष्ट्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुमारे २३ वर्ग कि.मी.मध्ये आहे. त्यापैकी १४.९५ वर्ग कि़मी. क्षेत्राचा सर्वाधिक विकास झाला आहे. राज्यातील पहिला फूड पार्क या वसाहतीत असल्याचा शासनाचा दावा आहे. ११० कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू आहे आणि १४ कारखान्यांचे काम प्रगतिपथावर आहे. एवढे सगळे असताना या क्षेत्राच्या विकासात काय उणिवा राहिल्या असतील, हा प्रश्न तारांकित आहे. विकिपीडिया (इनसायक्लोपीडिया) यावर बुटीबोरीसंदर्भात उपलब्ध माहितीनुसार जगाच्या औद्योगिक पटलावर या क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज का भासत असेल? बुटीबोरी ग्रामपंचायतची भूमिका काय? येथील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा आदी समस्यांवर लोकमत चमूने या क्षेत्राचे अवलोकन केले. त्याची माहिती आम्ही वेगवेगळ्या भागात प्रकाशित करीत आहोत.
तपासणीत पाणी रसायन मिश्रित
बुटीबोरी ग्रामपंचायत, नागपूरच्या रिजनल पब्लिक हेल्थ लेबॉरेटरीजमध्ये वर्षातून दोनदा पिण्याच्या पाण्याचे केमिकल परीक्षण करते. पाण्यात रसायन आणि कठोर धातूंचे मिश्रण मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल रिसर्च लॅबने ग्रामपंचायतला दिला आहे. हे पाणी पिल्याने किडनी आणि लिव्हरवर विपरीत परिणाम पडू शकतो, असे चिकित्सकांनी सांगितले.