डॉ. परशराम पाटील, सदस्य, अभ्यास गट (एफएओ)
देशभरातील बाजार समित्या आणि वाहतूक व्यवस्थेत दरवर्षी साधारण १.५३ लाख कोटी मूल्याचे अन्नधान्य, फळे, भाजीपाल्याची नासाडी अर्थात नुकसान होते, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अहवालात गेल्या वर्षी नमूद करण्यात आले होते. त्यात केवळ वाहतुकीदरम्यान नाशवंत पिकांचे ५ ते १० टक्के नुकसान होते, असे नाबार्डच्या अभ्यासात दिसून आले होते. भारतासह गरीब, विकसनशील देशांमधील बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या फळे- भाजीपाल्यांची ३० ते ४० टक्के आणि अन्नधान्यांची सुमारे १० टक्के नासाडी होते. यावरून बाजार समितीत होणाऱ्या शेतमालाच्या नासाडीचा विषय किती गंभीर आहे, हे समजू शकते.
देशभरातील बाजार समित्यांमधील शेतमालाची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) नुकतीच एका अभ्यास गटाची स्थापना केली आहे. पाच जणांचा हा अभ्यास गट नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. वास्तविक केंद्र सरकारने हा प्रकल्प हाती घेण्याची गरज होती.
देशातील बाजार समित्यांमध्ये होणारी अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) बँकॉकच्या प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी मिता पंजाबी यांच्या अध्यक्षतेखाली फूड लॉस ॲण्ड वेस्ट मॅनेजमेंट ऑफ होलसेल मार्केट्स ऑफ इंडिया, या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ मार्केटिंग फेडरेशनचे (कोसाम) कार्यकारी अधिकारी जे. एम. यादव अभ्यास गटाचे समन्वयक आहेत. हवामान बदलाचे अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ भरत नागर, अन्न शास्त्रज्ञ डॉ. रावसाहेब मोहिते व माझा सदस्य म्हणून समावेश केला आहे.
शेतमालाची उपलब्धता कमी झाल्याने एकीकडे ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करावी लागते. दुसरीकडे शेतमाल उत्पादनावर खर्च झालेले जमिनीतील पोषक घटक, पाणी, खते, औषधे, मनुष्यबळ, भांडवल वाया जाते.
एकीकडे वाढत्या तापमानामुळे शेतीवर गंभीर संकट आलेले असताना उच्च पोषणमूल्य असलेल्या अन्नाची नासाडी होणे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला परवडणारे नाही. कारण यातून अर्थव्यवस्थेवर आणि अन्न सुरक्षेवर मोठा ताण येत आहे. ७४ दशलक्ष टन एवढे दरवर्षी नुकसान भारतातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे होते. ते देशाच्या एकूण अन्नधान्य आणि बागायती पिकांच्या उत्पादनाच्या १०% टक्के आहे.
मुंबई बाजार समितीत दररोज २०० टन शेतमालाची नासाडी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सुमारे २०० टन शेतमालाची नासाडी होते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज भाजीपाला, फळे, फुले, धान्यांची नासाडी होऊन ५० ते ६० टन कचरा निर्माण होतो.
साधारण १० ते १५ टन कचऱ्यातून एक टन मिथेन वायू (एक टन मिथेन : १३९६.६ क्युबिक मीटर) निर्माण होतो. एक टन मिथेन वायू हा २३ टन कार्बन डायऑक्साईड इतका घातक आहे. मिथेन वायू हवेतील उष्णता शोषून घेत असल्यामुळे तापमान वाढीला कारणीभूत ठरतो. त्यामुळे जगभरात मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी कृषी कचऱ्यापासून सेंद्रिय खत, बायोगॅस निर्मितीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.
पिकांच्या नासाडीची कारणे
योग्य साठवणूक सुविधांचा अभाववाहतुकीसह इतर अपुऱ्या पायाभूत सुविधाअकार्यक्षम पुरवठा साखळीकापणीनंतरची अयोग्य हाताळणी
कांदे, बटाटे आणि टोमॅटो यांसारख्या फळभाज्यांचेही मोठे नुकसान होते. ५,१५६ कोटी मूल्याचा कांदा आणि ५,९२१ कोटी मूल्याच्या टोमॅटो पिकाची नासाडी होेते. सर्वाधिक नुकसानकेळी, आंबा आणि लिंबूवर्गीय फळांचे सर्वाधिक अनुक्रमे ५,७७७ कोटी, १०,५८१ कोटी, ४,३४७ कोटी
अन्नधान्याची नासाडी, शेतमालाचा प्रकार नुकसान (कोटी रु.)
तांदूळ, गहू, मका २६,०००
डाळी, तेलबियांचे १८,०००
फळे, भाजीपाला ५७,०००