Nana Patole on CJI Bhushan Gawai Mumbai Visit: देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष आणि सरन्यायाधीश यांच्याबाबतीत एक विशेष प्रोटोकॉल असतो. त्यांच्या दौऱ्याची माहिती आधी दिलेली असते. पण आम्हाला माहिती नव्हती असे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि विमानतळावर त्यांना रिसिव्ह करायला कुणीही हजर राहिले नाही. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. पण आपल्या सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनीच केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान करणे हे देश व राज्याला सहन न होणारे आहे, असे रोखठोक मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले. तसेच, सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
म्हणून अपमान केला का?
"सरन्यायाधीश येणार आहेत हे आम्हाला माहितीच नव्हते असे अधिकारी वर्ग सांगत आहेत. हे पटणारे नाही. सरन्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारने महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे. सरन्यायाधीश त्यावर गमतीने बोलले, पण तो प्रशासनाला इशारा आहे. तो कदाचित सरकारला कळला नसेल. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते का? हे समजले पाहिजे," असे पटोले म्हणाले.
हे फारच दुर्दैवी
"शिव, शाहू, फुले आंबेकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराचा व्यक्ती सरन्यायाधीश झाला. त्याचा आनंद साऱ्यांनाच झाला आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत. साऱ्यांनाच प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. पण तरीही अशी चूक करणे आणि त्याचे गांभीर्य न कळणे खूपच दुर्दैवी आहे," अशी टीकाही त्यांनी केली.
फुले चित्रपट टॅक्स फ्री करा
"राज्य सरकार सर्वधर्म समभाव मानत असेल, तर महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत. पण फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का?" असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.