महापालिकांची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी १२ डिसेंबरला येणार; सुधारित आदेशानुसार जारी करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:36 IST2025-11-05T12:35:48+5:302025-11-05T12:36:35+5:30
२९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल

महापालिकांची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी १२ डिसेंबरला येणार; सुधारित आदेशानुसार जारी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल केला आहे. २८ नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती, ती आता १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महापालिका प्रशासन आता प्रारुप मतदार यादी ६ नोव्हेंबर ऐवजी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. या यादीवर १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हरकती व सूचना मागवून ६ डिसेंबर रोजी निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर ८ डिसेंबरला रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करून १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार या यादी सुधारित आदेशानुसार जारी केली जाणार आहे.
‘दुबार’वरून आयोगावर राज ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई: निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. आयोग फक्त संविधानात स्वायत्त आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातचे ते बाहुले असल्याची १००% खात्री पटली, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. ते म्हणाले, दुबार मतदार नोंदणी ते मतदार यादीतील घोळ यावरील प्रश्नावर आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर त्यांचा काय उपयोग आहे. जबाबदारी झटकली आहेच आता उत्तरदायित्वही नाकारणार. मग या पदांचे करायचे काय?
आयोगाने दुबार मतदारांसमोर दोन स्टार्स असतील असे सांगितले आहे. ज्या मतदार यादीत पत्ते चुकीचे आहेत. वडिलांचे नाव वेगळे आहे, एका घरात ४०-५० मतदार नोंदवले आहेत. अशी सगळी नावे गाळून मतदार यादी हवी आहे. स्टार करणार म्हणजे त्या माणसाला विचारणार? ती त्यांना कशी सापडणार? याचे काहीच उत्तर दिले नाही. आयोगाचे जे मालक आहेत तो भाजप त्यांचा अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील, अशी टीका उद्धवसेनेचे नेते आ. अनिल परब यांनी केली.
दुबार-तिबार नावांची जबाबदारी कोणाची?
प्रचंड घोळ असलेल्या मतदारयाद्या दुरुस्त न करता निवडणुका जाहीर करणे हे योग्य नाही. लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आयोगाची जबाबदारी आहे. पण, ती जबाबदारी न घेता त्यापासून पळ काढत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.