वॉर अँड पीस! शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट; काय सांगू पाहत होती बाबा आमटेंची नात?
By कुणाल गवाणकर | Updated: November 30, 2020 14:52 IST2020-11-30T14:30:29+5:302020-11-30T14:52:09+5:30
शीतल आमटेंची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

वॉर अँड पीस! शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट; काय सांगू पाहत होती बाबा आमटेंची नात?
चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटेंनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
शीतल आमटे-करजगी यांनी आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास एक ट्विट केलं होतं. वॉर अँड पीस या शीर्षकासह शीतल यांनी एका ऍक्रेलिक पेटिंगचा फोटो ट्विट केला होता. या ऍक्रेलिक पेटिंगच्या खाली त्यांचं स्वत:चं नाव आणि कालची तारीख आहे. शीतल यांच्या निधनाचं वृत्त येताच त्यांचं शेवटचं ट्विट चर्चेत आलं आहे. अनेकांनी त्यांच्या ट्विट खाली श्रद्धांजली वाहिली आहे. खूप जणांनी त्यांचं ट्विट लाईक आणि रिट्विटही केलं आहे. शीतल आमटेंनी याच पेंटिंगचा फोटो फेसबुकवरदेखील शेअर केला होता. शीतल यांच्या आत्महत्येनं अनेकांना धक्का बसला आहे.
'War and Peace'#acrylic on canvas.
— Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal) November 30, 2020
30 inches x 30 inches. pic.twitter.com/yxfFhuv89z
फेसबुक लाईव्हमधून शीतल यांचे गंभीर आरोप
डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
आमटे कुटुंबाचं स्पष्टीकरण; आरोप फेटाळले
'संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे,' असं त्या निवेदनात स्पष्ट केलं होतं.