बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 05:48 IST2025-03-02T05:48:05+5:302025-03-02T05:48:20+5:30
आठ आरोपींना अटक केली असून, कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

बीड प्रकरणात वाल्मीक कराडच ‘मास्टरमाइंड’; सोनवणेचे नाव वगळले, कोणावर कोणते गुन्हे?
लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे ‘सीआयडी’ने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. देशमुख हत्येसह इतर गुन्ह्यांचे १ हजार पानांचे दोषारोपपत्र ‘सीआयडी’ने गुरुवारी बीडच्या मकोका न्यायालयात दाखल केले. दोषारोपपत्रात वाल्मीक हा आरोपी क्रमांक एक आहे. मात्र, सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे याचे नाव या दोषारोपपत्रातून वगळण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पुरावा नसल्याचा खुलासा सीआयडीने केला.
सरपंच देशमुख हत्या, त्याअगोदर ॲट्रॉसिटी व मारहाण आणि खंडणी या गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे होता. या गुन्ह्यांत कराडसह नऊ जण आरोपी होते.
आरोपींची नावे आणि कोणावर कोणते गुन्हे?
१. वाल्मीक कराड : खून १
२. विष्णू चाटे : खून १
३. सुदर्शन घुले : खुनाचा प्रयत्न १, अपहरण २, खून १
४. प्रतीक घुले : विनयभंग १, दुखापत १, खून १
५. सुधीर सांगळे : खून १
६. महेश केदार : खुनाचा प्रयत्न २, खून १, चोरी १, दुखापत २
७. जयराम चाटे : खुनाचा प्रयत्न १, दुखापत १, खून १
८. कृष्णा आंधळे (फरार) : खुनाचा प्रयत्न १, दुखापत १, खंडणी १, खून १
सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा आरोप होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, लवकरच बाहेर येणार असल्याचे समजते.दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपींवर ११ गुन्हे दाखल आहेत. पैकी ८ गुन्ह्यांचे आरोपपत्र कोर्टात दाखल आहे.
‘सरपंच, तुला जिवंत सोडणार नाही’
६ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीकला खंडणी दिली नाही म्हणून सुदर्शन घुलेसह इतर मस्साजोगला गेले. तेथे कंपनीच्या सुरक्षा रक्षकाशी वाद घालत असतानाच सरपंच संतोष देशमुख तेथे आले. त्यांनी असे करू नका, अशी विनंती करत अडवले. यावर घुले याने ‘सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली होती.
प्रकरण केज कोर्टात वर्ग
आठ आरोपींना अटक केली असून, कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. सीआयडीने अनेक आरोप-प्रत्यारोप झालेल्या या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण केज न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.