मुंबईत थंडीची प्रतीक्षा; राज्यात मात्र हुडहुडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:41 IST2019-12-30T05:19:04+5:302019-12-30T06:41:37+5:30
मुंबई वगळता राज्यभरात बहुतांश शहरांच्या किमान तापमानात घट नोंद झाली असून मुंबईकरांना मात्र अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे.

मुंबईत थंडीची प्रतीक्षा; राज्यात मात्र हुडहुडी
मुंबई : राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २२.३ अंश नोंदवण्यात आले आहे. मुंबई वगळता राज्यभरात बहुतांश शहरांच्या किमान तापमानात घट नोंद झाली असून मुंबईकरांना मात्र अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे.
बंगालच्या उपसागरातून आग्नेय दिशेने येणारे वारे व अरबी समुद्राकडून नैऋत्य दिशेने येणारे वारे एकमेकांत विलीन होत असल्यामुळे एक संगम क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. या अभिसरणाच्या प्रभावामुळे विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांत ३० डिसेंबर रोजी विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर किंवा १ जानेवारीपर्यंत या विभागांत काही प्रमाणात मुसळधार पाऊस पडेल. या काळात गारपिटीची शक्यताही आहे. ही हवामानाची परिस्थिती २ जानेवारीपर्यंत राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
३० डिसेंबर : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
३१ डिसेंबर : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल.
१, २ जानेवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल.