राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 19:51 IST2019-09-17T19:49:32+5:302019-09-17T19:51:23+5:30
राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...
मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सबुरीचा सल्ला दिला आहे. राम मंदिराचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे शिवसेनेनं न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी, असं आठवलेंनी म्हटलं. आगामी विधानसभा निवडणूक आरपीआय भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही, या भूमिकेचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला.
जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही सोडणार नाही. अयोध्येत राम मंदिरासाठी पहिली वीट लावण्याचे कामही आम्हीच करू, असं उद्धव यांनी म्हटलं होतं.
राम मंदिराचा विषय १९९० पासून प्रलंबित आहे आणि तो अधिक काळ रेंगाळत ठेवता कामा नये. राम मंदिरासाठी आता थांबायला वेळ नाही. न्यायदेवतेनं लवकरात लवकर निर्णय द्यावा. निर्णय यायला उशीर लागत असेल, तर केंद्र सरकारनं विशेष कायदा तयार करावा. काश्मीर प्रश्नासाठी जसं धाडसी पाऊल उचललं, तसंच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावं, अशी मागणी उद्धव यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या आधीही उद्धव यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. पहले मंदिर, फिर सरकार अशी घोषणा देत त्यांनी अयोध्येलादेखील भेट दिली होती.